महंत नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यामुळे धनंजय देशमुख नाराज असून पुरावे करणार सादर करणार आहेत (फोटो - नवराष्ट्र)
बीड : मागील दोन महिन्यांपासून बीडमधील राजकारण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. यामुळे बीडसह राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला. बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे नाव समोर आले असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात होती. या प्रकरणामध्ये भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. यामुळे राजकारण ढवळून निघाले असून यावर आता मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मागील 53 दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. या प्रकरणामुळे राज्यभरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला असून ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मराठा नेते मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरुन धनंजय मुंडेविरोधात अनेक पुरावे सादर केले. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. सर्व पुराव्यांसह धनंजय देशमुख हे भगवानगडावर जाणार आहेत. याबाबत धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनंजय देशमुख म्हणाले की, “एका चापटीच्या बदल्यात खून करायची मानसिकता तुमची असेल तर तुम्ही समाजाचं देणं लागत नाहीत हे स्पष्ट झालंय. पण, अशी जर मानसिकता कोणी केली तर दिवसा मुदडे पडतील, अशा शब्दात धनंजय देशमुख यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीय संघर्ष नसून 18 पगड जातीचे लोक संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मागण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे, हा जातीय संघर्ष नसून ही विकृती असल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुखांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याही त्यांच्याकडचे सर्व पुरावे महंत नामदेव शास्त्रींना देणार आहेत. त्यामुळे महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
डॉ. नामदेव महाराज शास्त्रीय यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असे स्पष्ट मत महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले होते.