रांची : झारखंडमधील गुमला येथे एक धक्कादायक (Jharkhand Crime) घटना उघडकीस आली आहे. एका तरूणीची हत्या केल्यानंतर तिचे तीन तुकडे करून तिला विहिरीत फेकण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने स्वतःचे नाव बदलून आदिवासी मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला, त्यानंतर तिची हत्या केली.
इसान मिरदहा उर्फ बादल उर्फ छोटू असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनुसार, सदर पोलिस स्टेशन हद्दीतील फोरी गावात एका विहिरीतून मुलीचा शिरच्छेद केलेला मृतदेह 5 डिसेंबरला सापडला होता. शनिवारी तिचा एक हात सापडला. विहिरीतून जप्त केलेल्या पिशवीत सापडलेल्या आधारकार्डच्या आधारे मुलीच्या वडिलांच्या जबानीवरून गुमला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
एसपी हरविंदर सिंह यांनी सांगितले की, इसान हा मिरदहा उर्फ बादल उर्फ छोटू फोरीचा रहिवासी आहे. रानिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीला तो आधीपासूनच ओळखत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
मृताच्या मोबाईलवर काही छायाचित्रे होती. या छायाचित्राद्वारे मृत तरूणी त्याला ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे संतप्त होऊन आरोपीले तिला 27 नोव्हेंबरला फोन केला. त्या दिवशी फोरीमध्येही जत्रा होती. मुलीला विश्वासात घेऊन आरोपी इसानने तिला विहिरीजवळ नेले. तरुणाच्या सांगण्यावरून मुलीने स्वतःचे कपडे काढले. त्यानंतर तेथे आधीच ठेवलेल्या लटक्याने त्याने तिच्यावर हल्ला केला.