Photo Credit- Social Media
आंध्र प्रदेश : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. आता यासंदर्भात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने तिरुपती मंदिरातील लाडूंसंदर्भात मोठे विधान करत अक्षरश: संताप व्यक्त केला आहे. तिरुपती तिरुमला मंदिरातून 1 लाख लाडू अयोध्येला पाठवण्यात आल्याचा दावा मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी तिरुपती मंदिरातून १ लाख लाडू पाठवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. अयोध्येतील भाविकांमध्ये हे लाडू वाटण्यात आले. तिरुपती मंदिराच्या प्रसादात गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल मिसळल्याचेही तपासात समोर आले आहे. हे सर्व आंध्र प्रदेशातील तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या कार्यकाळात घडले.
हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; अनेक योजनांचा करणार शुभारंभ
टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी दावा केला आहे की, प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने पुरवलेल्या तुपाचे नमुने गुजरात स्थित पशुधन प्रयोगशाळेने भेसळ असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी प्रयोगशाळेत कलेल्या तपासणीचा अहवालही दाखवला आहे. या अहवालानुसार, तपासणीसाठी देण्यात आलेल्या तुपाच्या नमुन्यात “प्राण्यांची चरबी”, “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलच असल्याचा दावा करण्यात आला होता. सॅम्पलिंगची तारीख 9 जुलै 2024 होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलैचा होता.
तथापि, प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या आंध्र प्रदेश सरकार किंवा तिरुमाला तिरुपती देवस्थानने (TTD) यांच्या प्रयोगशाळेच्या अहवालावर अधिकृत पुष्टी केलेली नाही. नायडूंच्या आरोपांमुळे देवतेच्या पवित्र स्वरूपाचे नुकसान झाले आहे आणि भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी केला आहे.
हेही वाचा: ऐन विधानसभा निवडणुकीआधी राज्यात ‘या’ तिसऱ्या आघाडीची घोषणा