हैदराबाद : तेलंगणातील जोगुलम्बाबा गडवाल (Jogulamba Gadwal) जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. एका चिमुकल्याला झालेल्या जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विकने (Treatment with Fevikwik) उपचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसोगुर येथील रहिवासी असलेले वंशकृष्ण हे पत्नी सुनीता आणि मुलगा प्रवीण यांच्यासोबत तेलंगणामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. कार्यक्रमादरम्यान खेळत असताना प्रवीण खाली पडला. खेळताना पडल्यामुळे प्रवीणच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागाला दुखापत झाली. उपचारासाठी त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याची जखम खोलवर होती. जखमेवर टाके घालण्याऐवजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फेविक्विक लावले. हा प्रकार त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली.
पोलिसांनी तपास केला अन्…
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचारात निष्काळजीपणा दाखविल्याचे निष्पन्न झाले. ही बाब उघडकीस येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.