अमृतसर : आईच्या सततच्या आजारपणामुळे त्रासलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी एकत्र गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्हीही बहिणी अविवाहित होत्या. आईचं आजारपण वाढलेलं होतं. तिचा मृत्यू झाल्यानंतर एकटं कसं राहायचं अशी भीती या दोन्ही बहिणींना सतावत होती. त्यामुंळ सुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दोन्ही बहिणींनी एकत्र जीव देण्याचा निर्णय़ घेतला. पोलिसांनी शनिवारी सकाळी त्यांचे मृतदेह ताब्यात घेतला असून, आता पुढील तपास करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. पंजाबचं शहर असलेल्या अमृतसरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
कसा घडला प्रकार?
अमृतसरमधील लॉरेन्स रोडवर न्यू गार्डन एव्हेन्यूमध्ये हे कुटुंब राहत होतं. या दोन्ही बहिणींची नावं ज्योती कपूर आणि सीमा कपूर अशी होती. या दोघींचंही वय ५० वर्षांच्या आसपास होतं. दोघींनीही आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिलेली आहे. त्यात मृतदेहांचं पोस्टमार्टेम करु नये अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
आईच्या सततच्या आजारापणामुळे अडचणीत
या दोघीही बहिणी आपल्या आईसोबत एकाच घरात राहत होत्या. या दोन्ही बहिणींची लग्नही झालेली नव्हती. बऱ्याच कालावधीपासून त्यांची आई आजारी होती. आईचा मृत्यू झाला तर काय, अशी शंका त्यांच्या मनात डोकावत होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी याचा उल्लेखही केला आहे. आई गेल्यानंतर एकट्या या जगात कसं जगू शकणार, या भीतीनं त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं नमूद केलंय. यासाठी इतर कुणालाही जबाबदार धरु नये, असंही पत्रात लिहिण्यात आलं आहे.
पोलिसांकडून मृतदेह ताब्यात
पोलिसांनी या बहिणींचे मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात या बहिणींच्या नातेवाईकांचे जबाबही नोंदवण्यात येत आहेत. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करुन पुढील तपास करण्यात येणार आहे.