गेल्या अनेक महिन्यांपासून युक्रेन-रशिया युद्ध सुरु; युक्रेन वापरतोय चक्क खेळण्यातल्या बंदुका

रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यामध्ये सुरू असलेले युध्द संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. बलाढ्य अशा रशियासमोर शरणागती पत्करायला युक्रेन तयार नाही.

    नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन (Russia-Ukraine War) यांच्यामध्ये सुरू असलेले युध्द संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. बलाढ्य अशा रशियासमोर शरणागती पत्करायला युक्रेन तयार नाही. वास्तविक रशियाची लष्करी ताकद युक्रेनपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. तरीही युक्रेनचे सैनिक प्राणपणाने लढत आहेत.

    रशियन फौजांच्या हल्ल्यां ना तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. आता तर अशी माहिती समोर आली आहे की युक्रेन या युध्दात चक्क नकली बंदुका आणि शस्त्रास्त्रे वापरत आहे. या नकली शस्त्रांच्या धाकाने युक्रेनचे सैनिक रशियन सैनिकांना घाबरविण्यात यशस्वी ठरले आहेत. ठिक ठिकाणी नकली शस्त्रास्त्रे युक्रेनचे लष्कर तैनात करतात. ही शस्त्रास्त्रे उध्वस्त करण्यासाठी रशियन लष्कराकडून बॉबवर्षाव केला जातो, त्यामध्ये रशियाचे जबर आर्थिक नुकसान होत आहे.

    एका आघाडीच्या अर्थविषयक वर्तमानपत्राने यासंबंधीचे वृत्त प्रसिध्द केले आहे. त्यानुसार युक्रेनच्या सर्वात मोठ्या स्टिल प्लांटमध्ये कामगार लोखंडाच्या टाकाऊ तुकडयांपासून तसेच अन्य तत्सम वस्तुंपासून होवित्झर तोफा, बाँब लाँचिंग सिस्टीम आणि रडार यंत्रणेसारखी दिसणारी परंतु नकली शस्त्रास्त्रे बनवित आहेत. मेटइन्व्हेस्ट नावाच्या या स्टील प्लांटमध्ये आतापर्यंत अशाप्रकारची सुमारे २५० नकली शस्त्रास्त्रे तयार करून युक्रेनच्या सैन्याला पुरविण्यात आली आहेत.