मध्य प्रदेशातील बैतूलच्या ‘त्या’ चार केंद्रांवर आज पुन्हा मतदान; आता मधल्या बोटाला लागणार शाई

मध्य प्रदेशातील बैतूल लोकसभा मतदारसंघातील (Betul Lok Sabha Constituency) चार मतदान केंद्रांवर आज (दि.10) पुन्हा मतदान होणार आहे. या भागात 7 मे रोजी मतदान झाले होते. मात्र, बसला आग लागल्याने ईव्हीएम मशीन जळाल्या होत्या.

  भोपाळ : मध्य प्रदेशातील बैतूल लोकसभा मतदारसंघातील (Betul Lok Sabha Constituency) चार मतदान केंद्रांवर आज (दि.10) पुन्हा मतदान होणार आहे. या भागात 7 मे रोजी मतदान झाले होते. मात्र, बसला आग लागल्याने ईव्हीएम मशीन जळाल्या होत्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन यांनी बैतूल लोकसभा मतदारसंघातील मुलताई विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या चार मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

  केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी या संदर्भातील आदेशही जारी केले आहेत. ते म्हणाले की, विधानसभा क्रमांक १२९ अंतर्गत राजापूर, दुदर रयत, कुंदा रयत आणि चिखलीमाल मतदान केंद्रांवर १० मे (शुक्रवारी) फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे मतदान 10 मे (शुक्रवार) रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. 10 मे रोजी सकाळी 5.30 वाजता मॉक पोलची प्रक्रिया सुरू होईल.

  मधल्या बोटाला लावणार शाई

  पुनर्मतदान करताना मतदाराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटावर अमिट शाई लावली जाईल. भारतीय निवडणूक आयोगाने बैतूलचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांनाही सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना पर्यवेक्षकांसह पुनर्मतदानाची माहिती अनिवार्यपणे देणे आणि मतदान केंद्रात दोंडी (मुनाडी) मारून व्यापक प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  बसलाच लागली होती आग

  7 मे रोजी मतदान करून परतणाऱ्या बसला आग लागून अपघात झाला होता, याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी बैतुल यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पाठवली होती. या घटनेची माहिती मिळताच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोगाला घटनेची माहिती दिली. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने बैतूलच्या चार मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले.