'हा ५६ कोटी भाविकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार'; योगी आदित्यनाथ ममता बॅनर्जी, अखिलेश यादवांवर कडाडले
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधाने केली होती. ममता बॅनर्जी यांनी तर महाकुंभ आता मृत्युकुंभ बनला आहे, असा दावा केला होता. त्यावर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राजद प्रमुख लालू यादव, ममता बॅनर्जी आणि विरोधकांवर कडाडले. हा महाकुंभमध्ये स्नान केलेल्या ५६ कोटी भाविकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाच्या भव्यतेवर भर दिला आणि सनातन धर्म, गंगा आणि भारताविरुद्ध चुकीच्या माहितीचा प्रसार केल्याचा निषेध केला. “आपण येथे चर्चेत भाग घेत असताना, त्यावेळी ५६.२५ कोटींहून अधिक भाविकांनी प्रयागराजमध्ये पवित्र स्नान केले आहे. “जेव्हा आपण सनातन धर्म, गंगा, भारत किंवा महाकुंभ यांच्याविरुद्ध कोणतेही निराधार आरोप करतो किंवा बनावट व्हिडिओ बनवतो तेव्हा ते या ५६ कोटी लोकांच्या श्रद्धेशी खेळण्यासारखे आहे,” असं म्हणत त्यांनी विरोधकांनी सुनावलं.
योगी आदित्यनाथ पुढे म्हटले की ‘महाकुंभ समाजाचा आहे, कोणत्याही राजकीय घटकाचा नाही’. त्यांनी महाकुंभाचे आयोजन कोणत्याही विशिष्ट गटाने केले आहे या दाव्याचे खंडन केले.”हा कार्यक्रम कोणत्याही विशिष्ट पक्षाने किंवा संघटनेने आयोजित केलेला नाही. हा कार्यक्रम समाजाचा आहे, सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सेवक म्हणून तिथे आहे,”
“आपल्या सरकारला या शतकातील महाकुंभाशी जोडण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य आहे. देश आणि जगाने या कार्यक्रमात भाग घेतला आहे आणि सर्व खोट्या मोहिमांना दुर्लक्ष करून यशाच्या नव्या उंचीवर नेलं आहे. महाकुंभाचे सात दिवस शिल्लक आहेत आणि आकडेवारीनुसार, आज दुपारपर्यंत ५६ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे,” असे भाजप नेते म्हणाले.
महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनांना संबोधित करताना त्यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि दुर्घटनेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नांवर टीका केली. “२९ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत बळी पडलेल्या आणि कुंभमेळ्याला जाताना रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांसोबत आमच्या सहानुभूती आहेत. ” त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना आहेत, सरकार त्यांच्यासोबत आहे, सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल पण याचे राजकारण करणे कितपत योग्य आहे?” ते पुढे म्हणाले.
आदित्यनाथ यांनी सपा नेतृत्वाखालील विरोधी पक्ष कुंभमेळ्याच्या विरोधात असल्याचा आणि गेल्या विधानसभा अधिवेशनात उत्सवाच्या तयारीवरील चर्चेत भाग न घेतल्याचा आरोप केला.
“विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून महाकुंभाच्या विरोधात आहेत. गेल्या अधिवेशनात महाकुंभासाठी चर्चा आणि तयारी सुरू होती. आम्ही योजनांवर चर्चा केली असती आणि तुमच्या सूचना घेतल्या असत्या, पण तुम्ही सभागृह चालू दिले नाही. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी विचारले की महाकुंभावर पैसे खर्च करण्याची काय गरज होती. समाजवादी पक्षाच्या सोशल मीडिया हँडलने अशी भाषा वापरली जी कोणताही सुसंस्कृत समाज वापरणार नाही. लालू यादव यांनी कुंभाला ‘फलतू’ म्हटले. सपाच्या दुसऱ्या भागीदाराने सांगितले की महाकुंभ ‘मृत्यूकुंभ’ बनला आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष, राजद आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी बेजबाबदार विधाने केली. जर सनातन धर्माशी संबंधित कार्यक्रम आयोजित करणे गुन्हा असेल, तर आपले सरकार तो गुन्हा करत राहील,” असं त्यांनी स्पष्ट केलं.