'तो दावा निव्वळ मूर्खपणा'...; एपस्टीन निधी प्रकरणावरून कपिल सिब्बल यांचा भाजपवर पलटवार
Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना २०१० मध्ये अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात पुरस्कार मिळाला होता. या कार्यक्रमाला वैश्याव्यवसाय आणि लैंगिक गुन्हेगारीचे आरोप झालेल्या जेफ्री एपस्टिन ने निधी दिला होता. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.पण त्याचवेळी भाजपचे हे दावे मूर्खपणा असल्याचा पलटवार करत सिब्बल यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
काँग्रेसकडूनही (Congress) भाजपचे आरोप फेटाळून लावले आहे. सिब्बल त्या कार्यक्रमात एपस्टीनचे पाहुणे नव्हते. काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले की, ‘ सिब्बल त्यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री होते. शिक्षणात जागतिक सहकार्याकातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले होते. याचा जेफ्री एपस्टीनशी काहीही संबंध नाही.”
प्रदीप भंडारी यांचे आरोप
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये दावा केला आहे की, ”२०१० मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना एपस्टाईनने निधी दिलेला पुरस्कार देण्यात आला होता. काँग्रेसच्या परदेशी युनिटचे प्रमुख सॅम पित्रोदा हे देखील “त्याच गटाशी” संबंधित होते. भंडारी यांनी ‘एक्स’ वरील एक कागदपत्र शेअर केले, ज्यामध्ये २०१० मध्ये न्यू यॉर्कमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार समारंभात पित्रोदा यांच्यासह इतर मान्यवरांच्या यादीत सिब्बल यांचे नाव समाविष्ट असल्याचा दावा केला होता.
दरम्यान, अमेरिकेतील कुप्रसिद्ध गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित गोपनीय कागदपत्रे (Epstein Files) नुकतीच सार्वजनिक झाली आहेत. या फाईल्समध्ये काही भारतीय नावांचा उल्लेख आल्याने देशात मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. विशेषतः केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नावावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये हरदीप सिंग पुरी यांचे नाव समोर आल्यानंतर, काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “ज्या व्यक्तीचे नाव अशा गंभीर प्रकरणाशी जोडले गेले आहे, तिला पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे काँग्रेसने म्हटले आहे. मंत्री हरदीप पुरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझे एपस्टाईनशी असलेले संबंध केवळ व्यावसायिक (Professional) स्वरूपाचे होते. मी संयुक्त राष्ट्रात भारताचा राजदूत असताना काही अधिकृत शिष्टमंडळाचा भाग म्हणून त्याला ३-४ वेळा भेटलो होतो. त्याचा माझ्या वैयक्तिक किंवा कोणत्याही गुन्हेगारी कृत्याशी संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांना त्यांनी ‘बालिशपणा’ असे संबोधले आहे.






