accident
टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : टेंभुर्णी (ता.माढा) येथे बुधवारी (दि.५) वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात अकलुज ता.माळशिरस येथील युवक विनायक सुनील खिल्लारे व अंगद पांडुरंग ढवळे (रा. सापटणे ( टे) तालुका माढा) अशा दोघांचा मृत्यू झाला असून, अज्ञात वाहन चालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विनायक सुनील खिल्लारे (वय २२ रा. यशवंतनगर, अकलूज तालुका माळशिरस) हा मोटरसायकल (MH 45AK 1529) वरून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सापटणे पाटी जवळ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास येत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. तर अंगद पांडुरंग ढवळे (वय 55 वर्षे रा. सापटणे) टेंभुर्णी शहरातील कुर्डुवाडी चौकात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोटरसायकलने (MH 45 AH 5115) जात असताना ऊसाच्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने जखमी होऊन ठार झाले आहेत.
याप्रकरणी दोन्ही अज्ञात वाहन चालकाविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.