फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कणकवली(भगवान लोके): रत्नागरीहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा मुंबई गोवा महामार्गावरील जाणवली तरंदळे फाटा येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला आदळून महामार्गावर पलटी झाला. यात कंटेनर चालक सिद्दिकी (रा. कर्नाटक) याला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिक, कणकवली पोलीस, वाहतूक पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. हा अपघात सोमवारी दुपारी ३.४५ वा.च्या सुमारास झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.
महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली
कंटेनर चालक सिद्दिकी हा कर्नाटक येथून मासे घेऊन रत्नागिरी येथे गेला होता. तेथे कंटेनर खाली करून परत रत्नागिरीहून कर्नाटकच्या दिशेने जात होता. त्यादरम्यान कंटेनर जाणवली तरंदळे फाटा नजीक आला असता असता स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकाला आदळला. त्यानंतर येथील संरक्षण कठड्यावर चढून महामार्गावर पलटी झाला. यामुळे महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात कंटेनरच्या डिझेल टाकी महामार्गावर पडल्याने सर्वत्र डिझेल पडले होते. तसेच कंटेनरच्या समोरील दोन्ही चाक महामार्गावरच तुटून पडली होती.
नागरिकांनी केली कंटनेर चालकाला मदत
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कंटेनर चालक सिद्दिकी याला खाजगी वाहनाने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चालक सिद्दिकी याला डोक्याला उजव्या हाताला व पायाला दुखापती झाल्या आहेत. यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, पोलीस हवालदार दिगंबर घाडीगावकर, महिला पोलीस विनया सावंत, हवालदार विनोद चव्हाण तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार संदेश आबिटकर, महामार्ग वाहतूक पोलीस नितीन चोडणकर, महादेव साबळे, श्री. घाडी, श्री.मुंबरकर आदी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली.