शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : चेक बाऊन्सप्रकरणी (Check Bounce) शिरोली एमआयडीसी पोलिसांच्या अटकेत असलेल्या डीजे उर्फ दत्तात्रय मारुती जामदारला (वय ३८, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) या पेठवडगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान शिरोली एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हालोंडी येथील सुमारे आठ जणांनी डीजेच्या विरोधात आर्थिक फसवणुकीबाबत लेखी तक्रारी दिल्या आहेत. यामध्ये हालोंडीच्या खासगी सावकारांचाही समावेश आहे. संबंधित तक्रारीबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चौकशी होणार असल्याचे खांडवे यांनी सांगितले.
कमी किमतीत सोने मिळविण्याच्या आमिषाने भुरळ पडलेल्या अनेकांनी डीजेला लाखो रुपये दिले. बँक लिलावात आपण हे सोने खरेदी करत असल्याचे डीजेने पटवून दिले होते. त्यामुळे डीजेकडे अॅडव्हान्स रक्कम देणाऱ्यांनी याबाबत प्रचंड गोपनीयता पाळली होती. सोने आणि पैसे दोन्हीपैकी काहीच परत मिळत नसल्याने हवालदिल झालेले गुंतवणूकदार एकमेकांच्या संपर्कात आले. तोपर्यंत डीजे कोट्यवधी रुपये घेऊन गुंतवणूकदारांवर गुरगुरू लागला होता.
याबाबत पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. मात्र, त्यावेळी डीजेने चेक देऊन तक्रारदारांना पोलिस ठाण्यात जाण्यापासून रोखले. त्यानंतर सुशील चौगले व अण्णाप्पा चौगले (दोघेही रा. हालोंडी) यांनी डीजेच्या आर्थिक फसवणुकीबाबत (चेक बाऊन्स) पेठवडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात याचिका दाखल केली होती.