तीन वर्षातून एकदा येणारा महिना म्हणजे अधिक मास (Adhik Maas 2023) यालाच धोंड्याचा महिना म्हणातात. या दिवसातं महाराष्ट्रात अनेक सण व्रत वैकल्य केलं जातात. प्रामुख्याने याचं महत्त्व म्हणजे, जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. सासुरवाडीचे लोकं मोठ्या उत्साहात जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देतात. मात्र, अहमदनगर मधील पिंपळगाव उज्जैनी गावात जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आजही कायम आहे. याच्यामागे एक खास कारण सांगितलं जातं.
[read_also content=”कोण आहे मोनू मानेसर? ज्याच्या नावावर हिंदू-मुस्लिमांमध्ये पेटली ठिणगी, तोडफोड आणि जाळपोळीत तिघांचा मृत्यू https://www.navarashtra.com/crime/who-is-monu-manaser-connection-with-haryana-communal-violence-nrps-439369.html”]
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही गावाने प्रथेचे कडक पालन केले आहे. अधिक मासात प्रत्येक सासुरवाडीत जावयांना धोंडे खाऊ घालण्याची परंपरा राज्यभर पाळली जाते. जावयाला घरी बोलावून गोडधोड जेवण देऊन किमती वस्तू भेट दिली जाते. लेकीचेही यानिमित्त माहेरची मंडळी आदरातिथ्य करतात. ग्रामीण भागात अधिक महिन्याला धोंड्याचा महिनाच संबोधले जाते. त्यात जावई नवा असला तर त्याची जास्तच बडदास्त ठेवली जाते.
कुवतीप्रमाणे इतर भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, पिंपळगाव उज्जैनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे. या गावाची अधिक मासातील प्रथा नेमकी उलटी आहे. या गावात कुणीच जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ घालण्यासाठी घरी आमंत्रित करीत नाहीत. ही प्रथा कशी पडली व या प्रथेचे नेमके कारण काय?, याची माहिती गावातील कोणालाही सांगता येत नाही इतकी ही परंपरा जुनी आहे. या गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी समोर आल्या.
या गावात कधी काळी कोणी आपल्या जावयांना अधिक मासात धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत, असा गावकऱ्यांचा समज झाला. काहींच्या मते अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातल्यास गावात रोगराई सुरू झाली. यामुळे अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने जावयांना अधिक मासात धोंड्यांचे जेवण खाऊ घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली, असे सांगण्यात आले.
सरपंच म्हणतात…
आमच्या गावात अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची प्रथा आहे. सर्व गावकरी या प्रथेचे पालन करतात. ही प्रथा कधीपासून सुरु झाली हे कोणालाच ठाऊक नाही. परंपरेनुसार गावकरी त्या प्रथेचे पालन करतात. आजही ही प्रथा आम्ही पाळतो.
– मोनिका आढाव, सरपंच, पिंपळगाव उज्जैनी