सोलापूर : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये सर्वांचा सहभाग हवा, असे आवाहन (Solapur District Collector) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी केले. जिल्हा नियोजन भवन येथे आज सर्व विभागप्रमुख यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे प्रारंभी स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा वनउपसंचालक धैर्यशील पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कार्यकारी अभियंता प्रल्हाद कदम, प्रमुख उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक व संख्यात्मक मानाकंनाच्या आधारे स्वतंत्र्य सर्वेक्षण संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 या सर्वेक्षणाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख ३० गावांचे तीन मानांकनांच्या आधारे स्वच्छता व स्वच्छतेशी निगडीत कामांचे गुणवत्ता व संख्याबल लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत रँकिंग ठरविण्यात येणार आहे.
मोबाईल ऍपवर प्रतिसाद द्या : जिल्हाधिकारी शंभरकर
मोबाईलमध्ये ऍप स्टोअर्स ला जाऊन SSG2021 हे ऍप डाऊनलोड करून स्वच्छतेबाबत सोलापूर जिल्ह्यास प्रतिसाद देऊन आपले प्रतिक्रिया नोंदवा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंकरकर यांनी केले.
सार्वजनिक स्वच्छता महत्त्वपूर्ण : दिलीप स्वामी
सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षण ३ घटकामध्ये केले जाणार आहे. जिल्ह्यातील सेवाविषयक प्रगती ३५० गुण, थेट निरीक्षण ३०० गुण व नागरिकांचा प्रतिसाद ३५० गुण असणार आहेत.
जिल्ह्यातील किमान ३० ग्रामपंचायती मध्ये शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, बाजाराची ठिकाणे, या ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात सद्यस्थिती ची पडताळणी केली जाणार आहे. संस्थात्मक ठिकाणावरील स्वच्छता, १५ वा वित्त आयोगा करणेत आलेली स्वच्छतेची कामे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेली कामे या बाबी विचारात घेणेत येणार आहेत.
देशात सोलापूर जिल्हा अग्रणी राहण्यासाठी सहभाग हवा : सचिन जाधव
सोलापूर जिल्हा स्वच्छतेचे प्रतिसादमध्ये 2018 साली देशात दुसरे क्रमांकावर होता. स्वच्छ जिल्हा व स्वच्छतेचा प्रतिसाद यामध्ये जिल्ह्यात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये जिल्हा देशात आघाडीवर राहील, या दृष्ट्रीने सर्वांचे योगदान महत्वाचे आहे, असेही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सांगितले.