मुंबई : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध दि. १ जून पर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या दि. २ जून पासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत चर्चा करुन फेरप्रस्ताव शासनास पाठवावा असे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव विजय सौरभ, विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक विद्यापीठाचे विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक बैठकीस उपस्थित होते.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दि. २ जून २०२१ पासून विविध विद्याशाखांच्या हिवाळी-२०२० पदवी परीक्षा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील कोविड विषयक सध्य परिस्थिती पहाता तसेच राज्यातील कडक निर्बंध पहाता परीक्षेच्या नियोजन संदर्भामध्ये तसेच वेळापत्रकासंदर्भात सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश देशमुख यांनी दिले.
पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी-२०२१ परीक्षा २४ जून २०२१ पासून नियोजित होत्या. सदर परीक्षा या आधीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सदर परीक्षेचे वेळापत्रक जाहिर होणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत सर्व संबंधितांनी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि तसा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर करावा असे निर्देश देशमुख यांनी दिले.
Amit Deshmukhs re proposal regarding health university exams due to covid situation