फोटो सौजन्य - Social Media
बहुतेक लोकांना चांगली नोकरी, स्थिर जीवन हवे असते. पण काही व्यक्तींचे स्वप्न एवढे मोठे असते की कोणताही मोठा पगार, परदेशातील प्रतिष्ठा त्यांना थांबवू शकत नाही. जयपूरच्या अनुकृती शर्मांची कहाणी याचाच एक उत्कृष्ट उदाहरण आहे. अमेरिकेतील ‘नासा’मध्ये उच्च पगाराच्या नोकरीवर कार्यरत असताना त्यांनी ती नोकरी सोडून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि अखेर त्यांनी आयपीएस अधिकारी बनून देशसेवेचे स्वप्न साकार केले.
अनुकृती शर्मा यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९८७ रोजी राजस्थानमध्ये झाला. त्यांनी जयपूरमधील शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोलकाताच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च येथून बीएस-एमएस पदवी मिळवली. पुढे २०१२ साली त्यांची निवड अमेरिकेतील राईस युनिव्हर्सिटीमध्ये ज्वालामुखी संशोधनासाठी पीएचडीसाठी झाली.
पीएचडी दरम्यानच त्यांना नासामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्या महिन्याला दोन लाखांहून अधिक पगार मिळवू लागल्या. परंतु मन देशातच रमत असल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. आपल्या देशासाठी काहीतरी मोलाचं करण्याची तीव्र इच्छा त्यामागे होती. भारतात परतल्यावर २०१४ पासून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्स उत्तीर्ण झाल्यानंतर मेन्समध्ये अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात तर प्रिलिम्सही पास होऊ शकल्या नाहीत. परंतु त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. अखेर २०१८ मध्ये चौथ्या प्रयत्नात ३५५ वी रँक मिळवून त्यांची निवड आयआरएससाठी झाली. तरीही त्यांनी ती नोकरी नाकारली, कारण आयपीएस हेच त्यांचे अंतिम ध्येय होते.
२०२० मध्ये पाचव्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आणि त्या आयपीएस अधिकारी बनल्या. सध्या त्या उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) म्हणून कार्यरत आहेत. अनुकृती शर्मांची ही वाटचाल हे सिद्ध करते की जिद्द, चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या संघर्षातून नव्या पिढीसाठी एक प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे.