बॉलिवूडमध्ये अनेक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट येताना पाहायला मिळतं. समलैंगिकतेवरही अनेक चित्रपट आले आहेत. तेव्हा शुभ मंगल ज्यादा सावधान आणि दोस्ताना सारख्या चित्रपटांनी या संकल्पनेवर सकारात्मक संदेश देण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे, बधाई दो चित्रपट देखील हा संदेश देताना दिसत आहे.
‘बधाई दो’ ही कथा शार्दुल (राजकुमार राव) आणि सुमी (भूमी पेडणेकर) यांच्याभोवती फिरते, जे LGBTQ+ समुदायाचे सदस्य आहेत, ते ‘सोयीनुसार लग्न’ करण्यास सहमत झाल्यानंतर रूममेट म्हणून एकत्र राहतात. हा चित्रपट दाखवतो की एखाद्या व्यक्तीची लैंगिक प्रवृत्ती समाजात त्यांचे स्थान कसे ठरवते. शार्दुल, एक पोलिस अधिकारी आणि सुमी, एक पीई (क्रिडा) शिक्षिका, असा विवाह करायला तयार होतात ज्याला लॅव्हेंडर विवाह म्हणून संबोधले जाते. कुटुंबांच्या दबाबामुळे ते लग्न करत असतात.
दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णीने हा विषय अत्यंत संवेदनशील रीतीने हाताळला आहे आणि विनोदी आवाजात किंवा पंचलाईन जोडण्याच्या प्रयत्नात, समलैंगिक लोकांना कुठेही क्षुल्लक करत नाही. त्यामुळे दिग्दर्शनात चित्रपटाने चांगले गुण मिळवले आहेत. ‘बधाई दो’चा पहिला भाग राजकुमार आणि भूमीला विवाहित जोडपे म्हणून एकत्र राहताना आणि त्यांच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वांशी आणि जोडीदारांशी संपर्क साधताना होणारा त्रास दर्शवतो, तर दुसऱ्या अर्ध्या भागामध्ये ते त्यांच्या कुटुंबांसाठी समलैंगिकतेला सामान्य करण्यासाठी कसे प्रयत्न करतात यावर लक्ष केंद्रित करतात.
इतर सह कलाकारांमध्ये, सीमा पाहवा, शीबा चड्ढा, नितेश पांडे यांनी कथेला जोरदार पाठिंबा दिला आहे. त्यांच्या गमतीशीर संभाषणांमुळे काही ठिकाणी हशा पिकतो. गुलशन देवैयाला विसरून चालणार नाही, त्याचा खास कॅमिओ विशेष आकर्षण ठरतो. हा चित्रपटातील सर्वात मनमोहक क्षणांपैकी एक तो सीन नक्कीच आहे.
काही ठिकाणी चित्रपटाची लांबी काहीशी ताणलेली आहे असं वाटतं त्यामुळे काही सीन गरज नसताना घातलेले वाटतात. असं काहीवेळाच घडतं जेव्हा कथा रुळावरून दूर जाते आणि जास्त काळ ओढली जाते. पण सुदैवाने, चित्रपट वेळेत परत येतो आणि जो संदेश द्यायचा आहे तो देतो. बधाई दो हा एक धाडसी चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी अशा अनेक चित्रपटांची गरज भासणार आहे.