उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा कहर, पर्वतांमध्ये बर्फवृष्टी; (Photo Credit- X)
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत दाट धुके, तीव्र थंडी आणि मध्य भारतातील काही भागात तीव्र शीतलहरीचा कहर सुरु आहे. काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्वत आणि मैदानी भागात थंडी वाढली आहे. हवामान विभागाच्या मते, जम्मू-काश्मीरपासून बिहार आणि पूर्व भारतातील ओडिशापर्यंत दाट धुक्याने व्यापले आहे.
अनेक विभागात दाट धुक्याची जणू चादर पाहिला मिळाला मिळत आहे. ज्यामुळे अनेक भागात दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाली आहे. या कमी दृश्यमानतेमुळे, दिल्लीत ६६ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि रेल्वेचा वेगही कमी झाला आहे. राजधानी दिल्लीत किमान तापमान ९.१ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान १७.४ अंश सेल्सिअस होते. पुढील आठवड्यापर्यंत या हवामान संकटांपासून आराम मिळण्याची अपेक्षा सध्यातरी नाही. हवामान विभागाने आधीच दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडसाठी दाट धुक्याबद्दल रेड अलर्ट जारी केला होता.
दरम्यान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या पर्वतांवर सतत बर्फवृष्टी होत आहे, ज्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली आहे. खोऱ्यात, गुलमर्गमध्ये किमान तापमान उणे ७.० अंश सेल्सिअस, पहलगाममध्ये उणे ६.२ अंश सेल्सिअस आणि श्रीनगरमध्ये ०.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. बर्फवृष्टीमुळे बंद असलेला बांदीपोरा-गुरेझ रस्ता पुन्हा उघडण्यात आला आहे. मुघल रोड अजूनही बंद आहे. भदरवाहमध्ये बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.
अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसामुळे आलेल्या थंडीच्या लाटेमुळे थंडीचा जोर वाढला आहे. किन्नौर, लाहौल-स्पिती आणि वरच्या शिमला येथील अनेक भागात किमान तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे. ताबोमध्ये उणे ६.८ अंश सेल्सिअस, कुकुमसेरीमध्ये उणे ६.२ अंश सेल्सिअस आणि कल्पामध्ये उणे ३.० अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. उत्तराखंडमधील केदारनाथसह काही भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे पर्वत पांढऱ्या चादरीत लपेटले गेले आहेत. मुनस्यारीमध्ये, दीर्घकाळ बर्फवृष्टी न झाल्यामुळे काळी झालेली हिमालयाची शिखरे आता बर्फाच्या पांढऱ्या चादरीत लपेटली आहेत.
हेदेखील वाचा : Air Pollution : राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली; AQI पोहोचला 400 च्या वर, श्वास घेणे झाले अवघड






