अकलूज : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा (Wine Selling Issue) निर्णय रद्द करा, अशी मागणी अकलूज येथील शिव शंकर बझारच्या चेअरमन व आंनदी गणेश ट्रस्टी स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी केली.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आपणास विनंती करिते की, स्वातंत्र्योत्तर काळात दारूची उपलब्धता कमी करून खरं तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे दारुमुक्त राष्ट्राचे विचार आत्मसात करून त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न कराल; पण वर्षोनुवर्षे दारुला प्रतिष्ठा देण्यातच सरकारांनी धन्यता मानून दारू म्हणजे जीवनावश्यक समजून गल्ली बोळात दुकान व बारमधून पावला पावलावर सरकारमान्य करून खुलेआम विक्रीसाठी खैरात वाटली आहे. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असतानाच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने बैठक घेवून सुपर मार्केट व दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीसह हजारो क्रांतिकारी देशभक्तांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांना सरकारने दिलेली श्रध्दांजली समजायची का? शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार मांडत असताना खरंच आपल्याला शेतकऱ्यांचा कळवळा आहे का? वाईन कंपन्यांमध्ये भागिदारीचे गुंतलेले नेत्यांचे हितसंबंध हे जनतेला समजत नाही का? यापुढे जाऊन कळस म्हणजे वाईन म्हणजे दारू नव्हे असे सांगताना आपण जनतेचे प्रतिनीधी आहोत याचा विसर पडला आहे का?, असा सवालही केला.