बिहार : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड अर्थात आरआरबी आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच एनटीपीसीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांचे आंदोलन अजूनही उग्र आहे. बुधवारीही विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी गोंधळ घातला आणि अनेक गाड्या पेटवून दिल्या. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना विद्यार्थ्यांकडून शांतता राखण्याचे आवाहन करणारी ज्येष्ठांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ४ मार्चला या प्रकरणी अहवाल सादर करणार आहे.
सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसेनंतर राज्याच्या राजधानीमधील पत्रकार नगर पोलीस स्थानकात अटकेत असणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवण्यात आला. या जबाबाच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेले आंदोलक विद्यार्थी हे या परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून आपण हिंसा आणि जाळपोळ केल्याची कबुली दिलीय. या व्हिडीओमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचं सांगितलं जात आहे.
खान सर हे एक लोकप्रिय शिक्षक आहेत. सोशल मीडिया आणि युट्यूबवर त्यांचं खान जीएस रिसर्च सेंटर नावाचं प्रसिद्ध चॅनेल आहे. कठीण गोष्टी सोप्या शब्दात समजून सांगण्याच्या शैलीसाठी खान सर यांना ओळखलं जातं.
समोर आलेल्या माहितीनुसार रेल्वे भरती बोर्डाने म्हणजेच आरआरबीने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीअंतर्गत (एनटीपीसी) नोकरभरतीसाठी सीबीटी-२ परीक्षाचे निकाल १४ आणि १५ जानेवारी २०२२ रोजी जारी केले. त्याच्या आधारे सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्याची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी निश्चित करणं आवश्यक होतं. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आरआरबी एनटीपीसीचा निकाल देताना घोटाळा करण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.
दरम्यान, राजधानी पटना येथील पत्रकार नगर पोलीस ठाण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ६ शिक्षक आणि कोचिंग ऑपरेटर खान सर यांच्यासह ३०० ते ४०० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार नगर पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रमुख मनोरंजन भारती यांनी स्वतःच्या जबानीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खान सरांव्यतिरिक्त एस.के.झा, नवीन सर अमरनाथ सर, गगन प्रताप सर, गोपाल प्रताप वर्मा सर आणि बाजार समितीच्या विविध कोचिंग ऑपरेटर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.