जिल्ह्यात पावसाची संततधार कायम (फोटो सौजन्य-X)
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भागांत पावसाने उघडीप दिल्याचे पाहिला मिळत आहे. असे असताना गेल्या पंधरवड्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाने जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधारा कायम आहे. यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
गेल्या 24 तासात सरासरी 30.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधारा कोसळत असल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, दुर्गम भागातील एक मार्ग बंद पडल्याने या भागातील वाहतूक सेवा प्रभावित झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे ठाकले होते. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली होती. तर शेतबांधातही पाणी साचले नसल्याने धान रोवणी करपण्यावर आली होती. यामुळे शेतकरी विवंचनेत सापडला होता.
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील ५ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली मंडळात सर्वाधिक ११२.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भामरागड तालुक्यातील ताडगाव मंडळात १०५, मुलचेरा ८४.४ जिमलगट्टा ७८.४ तर अहेरी तालुक्यातील पेरमिली मंडळात ६६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत
दक्षिण भागात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात पूरस्थितीचा धोका बळावला आहे. पूरस्थितीमुळे एटापल्ली तालुक्याअंतर्गत येत असलेल्या हेटलकसा-बोलेपल्ली-एटापल्ली हा राज्यमार्ग सायंकाळपर्यंत बंद होता. परिणामी, या मार्गावरील वाहतूक सेवा प्रभावित झाले असून, जनजीवन विस्कळीत झाले होते. अशातच मागील २ दिवसांपासून पावसाने पुनरागमन झाले असून, जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत.
नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा
मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे