कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीत कराड येथील शिवाजी विद्यालयातील मतदान केंद्रावर रविवारी एकूण ३३२ मतदारांपैकी ३२५ मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कराड सोसायटी मतदारसंघात (Karad Society Constituency) शंभर टक्के मतदान झाले आहेत. एकूण सर्व १४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. या गटात राज्याचे सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजीमंत्री स्व. विलासराव पाटील -उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली आहे. या लढतीत १०० टक्के मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून दोन्ही गटांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या प्रहातच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापल्या मतदारांना घेऊन येताना दिसून आले. कोणत्याही वादविवादा शिवाय ही मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारनंतर काही तुरळक मतदान झाले. सोसायटी मतदारसंघातील सर्व मतदान दुपारी ४ वाजता पूर्ण झाले होते. तर उर्वरित गटातील मतदान प्रक्रिया वेळ संपेपर्यंत सुरू होती.
नागरी बँका/नागरी सहकारी पतपेढ्या/ ग्रामीण बिगरशेती संस्था/ पगारदार नोकरांच्या पतसंस्था यांचे प्रतिनिधित्व करणार्या गटात एकूण ६९ मतदाना पैकी ६७ मतदान झाले.
राखीव प्रवर्ग – महिला प्रतिनिधी, राखीव प्रवर्ग इतर मागासवर्गीय सदस्य यांचे प्रतिनिधित्व करणार्या गटात एकूण १२३ मतदाना पैकी ११८ मतदान झाले. या मतदान केंद्रावर ९७.८९ टक्के मतदान शांततेत पार पडले.
मतदान केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप
कराड सोसायटी मतदार संघातील लढाई प्रतिष्ठेची झाल्याने पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिवाजी विद्यालयाच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी.आर.पाटील, तालुका पोलीस निरिक्षक बाळासाहेब खोबरे, सहा.पो.नि विजय गोडसे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात होता. मतदान केंद्रावर मतदारांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता.
भोसले पितापुत्र सहकारमंत्र्यांच्या शामियानात…
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कराड सोसायटी मतदारसंघात भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या तंबूत हजेरी लावत मतदारांना ताकद दिली. कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले हेही बाळासाहेबांच्या शामियानात उपस्थितीत होते. त्यामुळे या लढतीत भोसले गटाने आणि सहकारमंत्री गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले. यावेळी बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. आम्ही केलेल्या सहकार्यामधून काय निष्पन्न होईल, हे लवकरच कळेल, असे सुचक वक्तव्य केले.
सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील : बाळासाहेब पाटील
कराड सोसायटी मतदारसंघाचे मतदान पूर्ण झाल्यानंतर बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडले आहे. जावळीमध्ये वादावादीचा प्रसंग घडला परंतु नंतर त्यामध्ये समेट घडून आला. त्यामुळे तेथील ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडले. जिल्ह्यात सहकार पॅनेलचे ११ उमेदवार बिनविरोध झाल्या आहेत आणि ज्या जागांसाठी निवडणूक लागली आहे, त्या जागेवरील सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.