Inflation Rate : गेल्या काही दिवसांमध्ये वाढत्या महागाई दराने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र, आता सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. देशातील सर्व बँकांची शिखर संस्था असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच धडकी भरवणाऱ्या महागाई दरात लवकरच घसरण होण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
काय म्हटलंय आरबीआयने अहवालात?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, यावर्षी सामान्यांना महागाईपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार 2024-25 मध्ये किरकोळ महागाई दर हा साडेचार टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी अनेक रेटिंग एजेन्सीने घाऊक महागाई दर हा 5 टक्के पेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
काय म्हणतोय क्रिसिलचा अहवाल?
मात्र, असे असले तरी क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड) आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या जून महिन्यात पावसाचा अंदाज पाहता, भाजीपाला आणि पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे येत्या काही महिन्यापर्यंत भाजीपाल्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाई दरात घट होणार असल्याचे म्हटले असले तरी क्रिसिलने मात्र, भाजीपाला दर उतरणीला लागण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले आहे.
एप्रिल २०२४ या महिन्यामध्ये घाऊक बाजारातील महागाई दर हा 4.83 टक्के तर मार्च २०२४ मध्ये हा दर 4.85 टक्के इतका नोंदवला गेला होता. उपलब्ध आकडेवारीनुसार, येत्या काळात भाजीपाला, डाळी आणि अन्नधान्यासह खाण्यापिण्याच्या वस्तुंबाबत महागाई राहण्याची शक्यता कायम असणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये खाद्य महागाई दरात वाढ होऊन, तो 8.70 टक्क्यापर्यंत पोहचला आहे. अशातच आता खाद्य महागाई दर हे चढेच राहण्याची शक्यता असल्याचे क्रिसिलने म्हटले आहे.
भाजीपाल्याच्या किमतींमध्ये वेगाने वाढ
हिरवा वाटाणा वर्षांपूर्वी एप्रिल २०२३ मध्ये 4443 रुपये प्रति क्विंटल विकला जात होता. ज्यात सध्या ३४ टक्क्यांनी दरवाढ होऊन तो 5993 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. गाजराच्या किमतीमध्ये देखील २० टक्के इतकी मोठी वाढ दिसून आली आहे. बाजार समित्यांमध्ये गाजराला सध्या 2002 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. जो मागील वर्षीच्या एप्रिल २०२३ या महिन्यामध्ये 1658 रुपये प्रति क्विंटल इतका मिळत होता.
कांद्याच्या दरामध्ये देखील मागील वर्षीच्या तुलनेत काहीशी वाढ दिसून आली असून, सध्या कांद्याला घाऊक बाजारात 1362 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. जो मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये 813 रुपये प्रति क्विंटल इतका होता. टोमॅटोच्या भावामध्ये देखील ६२ टक्क्यांनी वाढ दिसून आली असून, साध्य टोमॅटो 1512 रुपये प्रति क्विंटल इतक्या दराने मिळत आहे. जो मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये 930 रुपये इतका मिळत होता. इतकेच नाही तर बटाट्याच्या किंमतीमध्ये देखील 12 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. सध्या बटाटा 1604 रुपये प्रति क्विंटल दराने मिळत आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 834 रुपये प्रति क्विंटल दराने मिळत होता.