कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट केव्हा रिलीज होणार ? मुंबई हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला दिले महत्वाचे आदेश
Emergency Movie Censor Board : बॉलिवूडची पंगा गर्ल अर्थात अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी कंगना अनेकदा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. मात्र, कंगनाचा हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. कंगनाने या संदर्भात एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत कोर्टात धाव घेईन, असं म्हटलं आहे.
शिरोमणी अकाली दल (एसएडी) च्या दिल्ली युनिटनेही कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाविरोधात मोर्चा काढला होता. पक्षाच्या दिल्ली युनिटच्या अध्यक्षांनी सेन्सॉर बोर्ड आणि कंगनाच्या प्रोडक्शन हाऊसला चित्रपटाबाबत नोटीस पाठवली होती. शिरोमणी अकाली दलच्या दिल्ली युनिटच्या अध्यक्षांनी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली. कंगनाने एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तिने आमच्या चित्रपटाला मान्यता मिळाली असली तरी प्रमाणपत्र मिळालं नाही, असं कंगनाने म्हटलं आहे.
व्हिडिओत कंगना म्हटली की, “सध्या सोशल मीडियावर आमच्या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाले आहे, अशी खोटी माहिती पसरवली जात आहे. पण ही बातमी खोटी आहे. वास्तविक, आमचा चित्रपट मंजूर झाला होता पण त्याचे प्रमाणपत्र रोखण्यात आले आहे. मला आणि सेन्सॉर बोर्डालाही जीवे मारण्याची धमक्या दिल्या जात असल्यामुळे त्याचे प्रमाणपत्र रोखण्यात आले आहे. माझ्यासाठी ही चिंताजनक बाब आहे.’
“श्रीमती गांधी यांची हत्या न दाखवण्याचा दबाव आमच्यावर टाकण्यात येत आहे. पंजाबमधील दृश्यांवर बंदी आणली जात आहे. त्यामुळे नेमकं चित्रपटात काय दाखवायचं हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहिला आहे.” देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून आणि वेगवेगळ्या स्थानिक पक्षांकडून कंगनाच्या चित्रपटाला प्रदर्शनासाठी विरोध दर्शवला जात आहे. चित्रपट येत्या ६ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. कंगना रणौत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी, सतिश कौशिक, भूमिका चावलासह अशी अनेक तगडी स्टारकास्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे