वसई : नालासोपाऱ्यातील धानिव बाग येथे सापडलेल्या अज्ञात महिलेच्या हत्येचा (Murder of Woman) छडा पेल्हार पोलिसांनी लावला आहे. सायराबानू शाह असे या महिलेचे नाव असून, अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. डोंगराखालील ओव्हळात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे रहस्य उलगडून अवघ्या ७२ तासात आरोपीला दिल्ली येथून अटक करण्यात आली.
नालासोपारा पूर्वेकडील थोदाडा डोंगराच्या खाली असलेल्या ओव्हळात 28 मे रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. तिच्या गळ्यावर, छातीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्यात आला होता. शेतकऱ्याने हा मृतदेह पाहिल्यानंतर तशी माहिती पोलिसांना दिली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी स्वतः तपास सुरु केला होता.
गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील त्यांना याकामी मदत करीत होते. घटनास्थळी मृत महिलेच्या मृतदेहाजवळ एक स्प्रे सापडला होता. हा स्प्रे आरोपीने वापरल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आसपासच्या परिसरातील मेडिकलमध्ये तपास केला.