‘राज्यात जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाढल्या आहेत. या वाढलेल्या जागांचा विचार केल्यास राज्यात भाजपचा जनाधार कमी झालाय हा निष्कर्ष निघतो.’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. राज्यात काही ठिकाणी सर्व पक्ष स्वबळावर लढले असतानाही भाजपचा पराभव झाला हे लक्षात घेण्याची गरज आहे.
‘आगामी काळात निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी एकत्र राहील ही सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांची भूमिका आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून गोष्टी ठरतील, असे त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आम्ही एकत्र लढावे अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीला अजून वेळ असल्याने योग्य तो निर्णय त्यावेळी घेतला जाईल.’ असे जयंत पाटील म्हणाले.
‘निवडणूक झाल्यावर यात सत्तेचा गैरवापर होतोय असे सांगणे म्हणजे रडीचा डाव असल्याचे पाटील म्हणाले. निवडणुकीच्या आधी जर या गोष्टी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या असत्या तर त्यात तथ्य आहे. असं म्हणता आलं असतं, मात्र भाजपचा पराभव झाल्यानंतर असे आरोप करणे हे योग्य नाही.’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारवर केलेले आरोप पाटील यांनी फेटाळले आहेत.