अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : दहापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेली जिल्ह्यातील ६१ गावे जिल्हा प्रशासनाकडून १३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन (Lockdown in Ahmednagar) करण्यात आली आहेत. या काळात गावात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून, लग्न सोहळ्यासह शाळा उघडण्यालाही मनाई (School Closed) करण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यात रोज ५०० ते ८०० कोरोना बाधितांचा आकडा समोर येतो आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. कोरोनाचे संक्रमण अटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दहापेक्षा अधिक बाधित असलेली ६१ गावे लॉकडाऊन केली आहेत. या गावात शंभर टक्के लसीकरण (Vaccination) केले जाणार आहे.
…तर किराणा, दूध डेअरी सील
या गावातील दूध संकलन घरोघरी जावून केले जाणार आहे. ते शक्य नसल्याने डेअरीवर दूध संकलन करताना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. उल्लंघन झाल्यास महिनाभर ते दूध संकलन केंद्रच सील केले जाईल. किराणा दुकाने सकाळी ८ ते ११ वेळेत सुरू राहतील. दुकानदार व ग्राहकांना मास्क सक्तीचे आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास ते किराणा दुकानही सील केले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
ही गावे लॉकडाऊन
तालुका गावे
अकोले – लिंगदेव, वीरगाव, परखतपूर
कर्जत – खांडवी, बाभूळगाव दुमाला
कोपरगाव – गोधेगाव
नेवासा – कुकाणा
पारनेर – वडनेर बु., कान्हूरपठार, गोरेगाव, दैठणे गुंजाळ, जामगाव, भाळवणी
पाथर्डी – तिसगाव
राहाता – भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, कोºहाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु.
संगमनेर – गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., पारेगाव बु,पानोडी, शिबलापूर,बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, कोल्हेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगाव पान, सायखिंडी
शेवगाव- भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाणे बु.,
श्रीगोंदा- लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी
श्रीरामपूर- बेलापूर खुर्द, उक्कलगाव,कारेगाव.
येण्या-जाण्यावर बंदी
लॉकडाऊन झालेल्या या गावातील नागरिकांना गावातून बाहेर ये जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. गावातून दुसऱ्या गावात जाणाऱ्यांना सवलत दिली जाईल. मात्र, त्यांना या गावात थांबता येणार नाही. गावात येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील ड्रायव्हरची कोरोना टेस्ट करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. पोलीस व महसुल प्रशासना या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहे.