राज ठाकरे (फोटो-ट्विटर)
महाराष्ट्राच्या बदलापूर येथे मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना घडली आहे. बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले, शेकडो नागरिकांनी उपनगरीय रेल्वेची वाहतूकही रोखून धरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा मागील पाच तासांपासून ठप्प झाली. सकाळपासून संतप्त नागरिकांनी आरोपीला आजच्या आज फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी लावून धरली. दरम्यान सरकारच्या वतीने संकटमोचक अशी ओळख असलेली मंत्री गिरीश महाजन हे स्थानकावर दाखल झाले आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर येथील शाळेत अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हणाले, ”बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या.”
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 20, 2024
गेल्या सात तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिक आंदोलन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिक आंदोलन करत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र त्यांना यश मिळताना दिसत नाहीये. दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे आंदोलकांशी बोलत असून, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करत आहेत. कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल असे आश्वासन दिले जात आहे. मात्र आंदोलक आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत.