पुणे : पुण्याच्या विकासासाठी माेदी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी काेणतीही कसर साेडली जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी येथे दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. तर काॅंग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमानच केल्याची टीकाही त्यांनी केली.
महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि हिरवळीवरील नियाेजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी ते बाेलत हाेते. महापाैर मुरलीधर माेहाेळ, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमहापाैर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर आदी यावेळी उपस्थित हाेते.
शहा यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशाच्या उभारणीमधील याेगदानाची माहीती दिली. ते म्हणाले, ‘‘स्वराज्य आणि स्वधर्म हे दाेन शब्द उच्चारण्याची भीती वाटावी अशी परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याचा अग्नि त्यांच्यामध्ये किती धगधगत हाेता, त्यासाठी संपूर्ण जीवनाचे याेगदान दिल्याचे त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. सैन्याचे अत्याधुनिकीकरण, नाैदलाची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पुढे सुरुच राहिले. आज ते पूर्ण झाले आहे.’’
…म्हणून आपली राज्यघटना सर्वश्रेष्ठ राज्यघटना
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घटना निर्मितीमधील याेगदानाविषयी शहा म्हणाले, ‘‘पूर्ण जीवनात त्यांना अवहेलना, अपमान सहन करावे लागले. परंतु त्याचा परिणाम त्यांनी घटनानिर्मिती करताना हाेऊ दिला नाही. दलित, आदिवासीबराेबरच देशातील प्रत्येक नागरिकाचे अधिकार हे अबाधित ठेवण्याचे काम त्यांनी केले. यामुळे आपल्या देशाची राज्यघटना ही देशातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. परंतु आज त्यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या काॅंग्रेसने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे जिंवत असताना आणि नंतरही त्यांचा अवमानच केला आहे.
डॉ. आंबेडकर निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसचे प्रयत्न
काॅंग्रेसची सत्ता असताना, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वाेच्च किताब दिला गेला नाही. ताे देण्याचे काम हे बिगर काॅंग्रेसी सरकारनेच केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु, त्याला काॅंग्रेस विराेध करीत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे निवडून संसदेत येऊ नये यासाठी काॅंग्रेसने प्रयत्न केले हाेते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या राज्यघटनेवरच माेदी सरकार देश चालवित आहे.’’
पुण्यातून सर्वाधिक स्टार्ट अप
पुण्याच्या संदर्भात शहा म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारने मदत केली. पुण्यातील मेट्राेच्या तीन काॅरिडाॅरचे काम माेदी सरकारच्या काळात सुरु झाले. स्मार्टसिटी याेजनेंतर्गत पुण्याला शंभर काेटी रुपये दिले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी एक हजार बसेस दिल्या. नदीसुधार याेजनेसाठी ११० काेटी रुपये दिले. स्टार्ट अप सर्वांत जास्त पुण्यातून आले हाेते. त्यापैकी स्टार्ट अप आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. पुण्याच्या विकासाकरीता केंद्र सरकार कटीबद्ध असून, त्यामध्ये काेणतीही कसर साेडली जाणार नाही.