उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एका पत्रकाराची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पत्रकार सुधीर सैनी यांचा कारमधील प्रवाशांनी वार करून खून केला आणि त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी खड्ड्यात फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे सहारनपूरच्या पत्रकारांमध्ये संताप आहे.
पत्रकार सुधीर सैनी हे सहारनपूरच्या कोतवाली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या चिलकाना रोडवरून बाईकवरुन सहारनपूरला येत होते. तेथे सुधीरची ओव्हरटेकिंगवरून कारमधील तीन तरुणांशी बाचाबाची झाली. त्यानंतर कारमधील तरुणांनी सुधीरला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत सुधीरला जबर दुखापत झाली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. सुधीर सैनी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई सुरू केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या कारच्या क्रमांकावरून कार थांबवली आणि कार ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी मृत सुधीरचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे. एसएसपी आकाश तोमर यांनी सांगितले की, रोड रेजमध्ये पत्रकार सुधीर सैनी यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या जहांगीर आणि फरमान यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपींवर कारवाई केली जाईल.
नगरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणाले, “शाह टाईम्सचे रिपोर्टर, सुधीर सैनी त्यांच्या मोटरसायकलवरून सहारनपूरच्या दिशेने येत होते. त्यांच्यासोबत एक अल्टो कारही येत होती, ज्यामध्ये तीन जण स्वार होते. ओव्हरटेक करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि कारमधील लोकांनी सुधीरवर प्राणघातक हल्ला केला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.