फोटो - संग्रहित
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांचा जामीन कायम ठेवण्यात आला आहे. सध्या नवाब मलिक हे वैद्यकीय जामीनावर आहेत. सर्वौच्च न्यायालयाकडूनच मलिक यांना काही काळासाठी हा जामीन देण्यात आला होता. आता नवाब मलिक यांच्या जामीनामध्ये मुदत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या समर्थकांनी समाधान व्यक्त केले आहे.
क्रूजवरील ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली होती. समीर वानखेडे यांनी लाच घेऊन शाहरुख खानचा लेक आर्यन खान याला अटक केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला. त्यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली. दाऊदशी संबंधित सलीम फ्रूटशी व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये त्यांना तुरुंगात जावं लागलं. मात्र 2023 मध्ये नवाब मलिक यांना अटीशर्तींसह जामीन मिळाला. त्यांच्या या जामीनाची मुदत संपल्यानंतर आता मलिक तुरुंगामध्ये पुन्हा जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र आता त्यांना दिलासा मिळाला असून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा वैद्यकीय जामीन कायम केला आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या समोर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्यामुळे नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात जावं लागणार नाही.
ईडीने का केलीये अटक?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. गोवावाला कंपाऊंड जमीन व्यवहार प्रकरणातील मनी लाँड्रिंगमुळे नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या. दाऊदशी संबंधित सलीम फ्रूटशी व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. आजारपणाच्या व प्रकृतीच्या कारणावरुन वैद्यकीय जामीन देण्यात आला होता. त्यावेळी जामीन अर्जामध्ये किडनी, यकृत, हृदय यासंबंधित व्याधी असल्याचं नमूद केलं होतं. त्यामुळे वैद्यकीय जामीन ऑगस्ट 2023मध्ये मिळाला असून यापुढेही त्यांचा जामीन कायम राहणार आहे.