Onion Market Rate : सध्याच्या घडीला बाजारात कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण जवळ आल्याने कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. ज्याचा थेट फायदा हा कांदा दरात वाढ होण्यास होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. अनेक शेतकरी सध्या कांदा दरातील आणखी तेजीची अपेक्षा ठेऊन आहे. ज्यामुळे सध्या बाजारात तुलनेने आवक कमी होत असल्याने, कांदा दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
१५ दिवसांत ५० टक्क्यांनी दरवाढ
राज्य सरकारच्या महाराष्ट्र पणन महामंडळाच्या बाजारभावाच्या आकडेवारीनुसार, मागील १५ दिवसांमध्ये कांद्याचे दर ५० टक्क्यांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले आहे. मागील पंधरवड्यात घाऊक बाजारात कांद्याचे दर हे १२०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास रेंगाळलेले होते. जे सध्या २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही कांदा दर वाढले असल्याचे दिसून येत आहे. ज्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी तर शेतकऱ्यांना मात्र याचा थेट फायदा होत आहे.
महाराष्ट्रातील घाऊक बाजारातील दर
राज्यात प्रामुख्याने पुणे या आघाडीच्या बाजार समितीसह राज्यभरातील घाऊक मार्केटमध्ये सध्या कांद्याचे दर हे ३० रुपये प्रति किलोहुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरातील कांदा दरात वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. ज्यामध्ये जून महिन्यात बाजारात येणारा कांदा हा प्रामुख्याने साठवणुकीचा कांदा असतो. शेतकरी चाळींमध्ये आपला कांदा साठवून ठेवतात. तर व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा करुन ठेवतात. परिणामी, बाजारात मागणी-पुरवठा यात तफावत जाणवत असल्याने कांदा दराने मोठी उसळी घेतली आहे.
कांदा दरवाढीमागील कारण काय?
गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कांद्याचे दर घसरलेले होते. ज्यात सध्या हळूहळू वाढ होत आहे. मात्र, कांदा दरवाढीमागील नेमके कारण काय? तर ४० टक्के कांदा निर्यात शुल्क असल्याने निर्यातीमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊन, निर्यात कमी होत आहे. मात्र, बकरी ईदमुळे कांद्याच्या देशांतर्गत मागणीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय दक्षिणेकडील राज्यांकडून महाराष्ट्रातील कांद्याला मोठी मागणी वाढली आहे. अशातच केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क हटविले जाण्याची शक्यता आहे. परिणामी, सध्या कांदा दरात वाढ होण्यास बळ मिळत आहे.