सिंधमध्ये आंदोलनाचा हिंसाचाराचा उद्रेक, आंदोलकांनी थेट गृहमंत्र्यांचे घर पेटवले
इस्लामाबाद: पाकिस्तानातील सिंध प्रातांतून महत्त्वाची अपडेच समोर आली आहे. सिंध प्रांताचे गृह मंत्री जियाउल हसन लंजर यांच्या निवासस्थानाची आंदोलकांनी तोडफोड आणि जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी घरातील खोल्या, फर्निचरला आग लावली आणि छतावरील एअर-कंडिशनरचा बाह्य भाग खाली फेकून दिला. मात्र, खासगी सुरक्षारक्षकांची अतिरिक्त फळी पोहोचल्यानंतर ही तोडफोड थांबवण्यात आली. सध्या संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून, अधिकृत सूत्रांकडून अद्याप परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील मोरो तालुक्यात मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावर मोठा हिंसाचार उफाळला. पोलीस आणि राष्ट्रवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांमध्ये हिंसक झटापट झाली. या संघर्षात किमान दोन आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही बाजूंतील अनेक कार्यकर्ते गंभीर आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सिंध प्रांतातील सहा कालवे आणि कॉर्पोरेट शेती प्रकल्पांच्या विरोधात आंदोलक रस्त्यावर उतरले होते. आंदोलनावेळी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनकर्त्यांना ठिय्या देण्यापासून रोखण्यासाठी बलाचा वापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर संतप्त आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील काही ट्रक लुटले आणि तीन वाहने पेटवून दिली, ज्यामध्ये एक तेल टँकरही होता.
हिंसाचाराचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओंमध्ये सशस्त्र सुरक्षारक्षक हवेत गोळीबार करताना दिसतात. लंजर यांच्या घरातून निघालेला काळा धुराचा लोट अनेक किलोमीटरपर्यंत पाहायला मिळाला. आंदोलकांनी युरियाने भरलेला ट्रेलर ट्रक लुटला आणि बोर्या खाली फेकून वाहन पेटवले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासन्तास ठप्प होती. इरफान लघारी आणि जाहिद लघारी या दोन कार्यकर्त्यांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा आरोप राष्ट्रवादी संघटनांनी केला आहे. या झटापटीत किमान तीन पोलिस जखमी झाले. एका गंभीर जखमी पोलिस कर्मचाऱ्याला रुग्णालयातून बाहेर हाकलले गेले, अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, काही आंदोलकांनी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापक कक्षात घुसून रोख रक्कम लुटल्याचा आरोपही आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिप्समध्ये आंदोलक पोलिसांवर लाठ्यांनी हल्ले करताना आणि शिवीगाळ करताना दिसतात, तर पोलिसांनी हवाई फायरिंग आणि अश्रुधुराच्या नळकांड्या वापरल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नवाबशाह आणि सुक्कूर येथून अतिरिक्त पोलिस दल बोलावण्यात आले. दरम्यान, अनेक राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी एका निवेदनात सांगितले की, शांततेत चाललेले आंदोलन जाणूनबुजून हिंसक वळणावर नेण्यात आले आणि राज्य सरकारने शेतकरीविरोधी प्रकल्पांच्या समर्थनार्थ पोलिसांचा वापर केल्याचा आरोप केला.
जियाउल हसन लंजर हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) ज्येष्ठ नेते असून सध्या सिंध प्रांताचे गृह, कायदा आणि संसदीय व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म २८ जुलै १९७४ रोजी नवाबशाह, सिंध येथे झाला. त्यांनी सिंध विद्यापीठातून कला, कायदा आणि मास्टर ऑफ लॉज या पदव्या प्राप्त केल्या आहेत. मार्च २०१६ मध्ये ते पीएस-२३ (नौशेरो फिरोज-V) मतदारसंघातून सिंध प्रांतीय विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. सद्याच्या सिंध सरकारमध्ये, मुख्यमंत्री सैयद मुराद अली शाह यांच्या नेतृत्वाखाली, लंजर यांच्याकडे गृह, कायदा आणि संसदीय व्यवहार विभागांची जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.