पुणे : शहरात गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या ३ हजार २०० पैकी सुमारे २ हजार ८०० जणांचा शाेध घेण्यात महापालिकेला (Pune Municipal Corporation) यश आले आहे. त्यापैकी एक जण वगळता इतर काेणामध्येही ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले नाही. उर्वरीत प्रवाश्यांचा शाेध सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत एकूण अकरा जणांना ओमायक्रॉनची (Omicron Virus) लागण झाल्याचे आढळून आले आहे.
काेराेनाची दुसरी लाट जून महिन्यापासून ओसरु लागली आहे. सध्या काेराेनाची परिस्थिती नियंत्रणात असून, सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहे. मात्र, काेराेनाच्या ‘ओमायक्रॉन’ या व्हेरिएंटचा धाेका निर्माण झाला आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या प्रवाश्यांचा शाेध घेण्यास महापालिकेच्या आराेग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. गेल्या महिन्याभरात पुण्यात परदेशातून आलेल्या ३ हजार २०० प्रवाश्यांपैकी २ हजार ८०० जणांपर्यंत महापालिकेची यंत्रणा पाेचली आहे. एका प्रवाशाला काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर त्याचे नमुने जीनोम सीक्वेंसिंगला पाठविण्यात आले हाेते. या प्रवाश्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर महापालिकेच्या आराेग्य विभागाने अधिक कडक पावले उचलली.
परदेशातून आलेल्यांची तपासणी केली जात आहे. यात काही जणांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले. मात्र, एक प्रवासी वगळता काेणालाही ओमायक्रॉन’ची लागण झाली नसल्याचे आराेग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पुण्यातील ओमायक्रॉनचा रुग्ण हा पूर्ण बरा झाला आहे. यामुळे दिलासादायक चित्र निर्माण झाले.