धकाधकीच्या सध्याच्या धावत्या युगात प्रमाण वाढत चाललेलया आजारांपैकी एक विकार म्हणजेच “वारंवार मानदुखी’ सर्व्हायकल स्पॉंडिलिसीस मणक्याच्या विकारापैकी कमरेच्या तुलनेत कमी प्रमाणात आढळणारा या विकारामुळे अनेकजण त्रस्त असल्याचे दिसून येते.
सर्व्हायकल स्पॉंडिलिसीस म्हणजे नक्की काय?
पृष्ठवंशाच्या मानेच्या भागात सात मणके असतात. प्रत्येक मणका एकमेकांशी सांध्याने जोडलेला असतो. ज्यावेळी विविध कारणांमुळे या मणक्यांची झीज होते, ज्यामुळे सांध्यांना सूज येते आणि यामुळे विविध तक्रारी उत्पन्न होतात. या विकाराला “सर्व्हायकल स्पॉंडिलीसी असे म्हटले होते. विविध कारणांमुळे मणक्याची झीज होऊ लागल्यानंतर मणक्यामध्ये रचनात्मक बदल होऊ लागतात ज्यामुळे तेथील सांध्यांना सूज येणे, स्नायू कडक होणे, शिरा कडक होणे, “ऑस्टीओफाईटस्’ मुळे शिरांवर दाब पडणे यामुळे मानेचे स्नायू व शिरा जास्त कडक होऊ लागतात आणि आकुंचित राहू लागतात आणि या सर्व घटनांमुळे विविध तक्रारी उत्पन्न होत असतात.

कारणे कोणती ?
सर्व्हायकल स्पॉंडलिसीसचा प्रतिबंध करण्यासाठी अथवा उपचार करताना या विकारातून लवकर बरे होण्यासाठी ही कारणे टाळणे महत्वाचे असते. तसेच बरा झालेला विकार पुन्हा होऊ नये यासाठी देखील ही कारणे माहित असावी लागतात. म्हणजे विकाराचा पुनरुद्धभव टाळता येतो. विविध कारणांनी मानेवर सातत्याने येणारा ताण हे सर्वात महत्वाचे कारण असते. रोज सातत्याने खाली वाकून अभ्यास करणे,मान एकाच पोझिशनमध्ये ठेवून कॉम्प्युटरवर काम करणे, ड्रायव्हिं करताना, प्रवास करताना मानेला आधार नसणे, कच्च्या रस्त्यावर वारंवार प्रवास करणे, अतिप्रवास करणे, टीव्ही बघताना तिरके बसणे, वारंवार मानेला हिसके देण्याची सवय, चुकीच्या पद्धतीचा व्यायाम, वेटलेफ्टिंग अतिप्रमाणात करत राहणे, वारंवार डोक्यावर ओझी वाहणे, डोक्यावरून पाणी भरणे, खाली वाकुन धुणे, भांडी धुणे, धारा काढणे, भांगलणे, मानेवर बोजा वाहणारे माथाडी कामगार, जडबॅग, जडपर्स सतत खांद्याला लावणे, लहान मुलाला वारंवार कडेवर घेणे, नोकरीसाठी नित्य नियमित जादा प्रवास, दीर्घकाळ सतत लिखाणकाम, झोपताना जाड उशी वापरण्याची सवय असणे, या सारख्या कारणामुळे मानेच्या मणक्याची झीज होत असते. कष्टाची कामे करूनही पोषक आहार न घेणे, कॅल्शियमची कमतरता, थंडी वाऱ्याचा मानेशी जादा संपर्क, पंखा- एसी याचा वारा मानेवर जादा घेणे, थंडीत स्वेटर न वापरणे, यासारख्या कारणांमुळे मानेच्या स्नायूंचे जखडणे वाढत असते.
कोणता त्रास होतो ?
या विकारांमुळे होणार त्रास विकाराच्या अवस्थेनुसार कमी अधिक प्रमाणात होत असतो. मान खांदे यामध्ये दुखणे, मान वळवताना त्रास होणे, मान जखडणे, मानेतून निघणारी वेदना डोक्याची मागील बाजू, खांदे, हात, याकडे पसरत जात असते. मानेच्या पाठीच्या वरच्या भागात गरम झाल्याची संवेदना, मानेकडून खांदे हात हाताची बोटापर्यंत वेदना पसरणे, मुंग्या येणे,बधीरपणा हा त्रास होत असतो. विकाराची तीव्रता जास्त असल्यास हातामध्ये अशक्तपणा, जडत्व, मुंग्या जास्त येणे, या तक्रारी येत असतात. काही जणात डोक्याची मागील बाजू दुखणे तर क्वचित संपूर्ण डोके दुखणे असाही त्रास होतो. मानेच्या खांद्याच्या डोक्याच्या तक्रारी सकाळी उठल्याबरोबर वाढलेल्या असतात. काही जणात ताणाचे काम, प्रवास यामुळे वाढत असतात. चक्कर येणे, पडतो असे वाटणे, थोडेसे फिरणे, पोझीशन बदलताना हा त्रास वाढणे असा काही जणात आढळत असतो. सततच्या त्रासामुळे त्रस्तपण वाढतो. काहीजणात अस्वस्थता चिडचिडेपणा एकाग्रता कमी होणे या तक्रारीही आढळून येतात. मानेच्या “एक्सरे’ ची तपासणी केल्यावर मानेची वक्रता बदललेली असते. दोन मणक्यांमधील अंतर बदलणे असणे, “”ऑस्टीओफाईटस्” तयार झालेले असणे, मणक्याची झीज झालेली असणे हे दोष आढळून येतात.
उपचार :
या विकारावर “सांघिक’ आयुर्वेदिक उपचार उत्तम गुणकारी ठरत आहेत. हे उपचार करताना सर्वप्रथम रुग्णाची प्रकृती, तक्रारींचे स्वरुप दैनंदिन कामाचे स्वरूप, मानेवर येणाऱ्या ताणाची कारण मिमांसा करून तसेच एक्स रेचा अभ्यास करून शास्त्रीय सांघिक आयुर्वेदिक उपचार केले जातात.
पंचकर्म उपचार :

निरंगुडी, दशमुळ, सहचर, शतावरी इत्यादीनी सिद्ध केलेल्या औषधी तेलाने मान, पाठ खांदा, हात, कमरेपर्यंतचा भाग यांना हलक्या हाताने मसाज केला जातो. त्यानंतर विविध औषधांच्या पाल्याचा गोळा औषधी गरम तेलात बुडवून त्याने तेलाने शेकणे म्हणजेच “”तैल पत्रपिडस्वेद” केला जातो. त्यानंतर औषधी काढ्याने वाफेने वाफारा दिला जातो. काही वेळा औषधी तेल नाकात टाकणे, नस्यकर्म, तैलबस्ती, तिक्त क्षार बस्ति शीरोधारा याचाही वापर केला जातो.
औषधी उपचार :
मानेच्या मणक्यातील सूज कमी करणारी, स्नायूंची जखडण कमी करणारी, तसेच मणक्यांची, स्नायूशिरांची ताकद वाढविणारी, शरीर मनोबल वाढवून वातप्रकोप कमी करणारी संयुक्त औषधे द्यावी लागतात. बला, रस्ना, दशमुळ, निरगुडी, पदमकाष्ट, शतावरी, अश्वगंधा, सहचर, गुग्गुळ, भल्लातक, कज्जली, वरुण, कांचनार, गोखरू, एरंड, गुळवेल, जटामासी, ब्राम्ही या वनस्पतीज आणि माक्षिक भस्म, अभ्रक भस्म, गोंदती, भस्म, कुकुटांड भस्म, मंडुर भस्म इ. खनिज औषधापासून केलेली संयुक्त औषधे रुग्णप्रकृती, आजाराच्या तीव्रतेचा विचार करून युक्तीने वापरावी लागतात.






