अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील डाक कार्यालय चोरट्यांनी फोडून तिजोरीच चोरून नेल्याची घटना बुधवार १२ जानेवारी रोजी पहाटे घडली आहे. घारगाव येथे डाक कार्यालय आहे. आतमध्ये सिमेंट व दगडी बांधकाम केलेली लोखंडी तिजोरी आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. आणि आत मध्ये असलेली लोखंडी तिजोरी चोरून नेली.
यासंदर्भात बोलताना संगमनेर डाकघरचे सहाय्यक अधिक्षक संतोष जोशी म्हणाले की, ‘आमच्या काही कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी पोस्ट ऑफीसचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. आमचे कर्मचारी ऑफीसला आल्यावर त्यांनी पाहिलं की तिजोरी गायब आहे. या तिजोरीत ६,८०१ रुपये रोख रक्कम, पोस्ट स्टॅंप १३, ३२३ रुपयांचा होता. रेव्हेन्यू स्टॅंप ४,२७०, ५,३०० रुपयांच्या इंडीयन पोस्टर ऑर्डर इतका ऐवज होता.’
सकाळी काही नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी घटनेची माहिती पोस्टमन किशोर पोळ यांना दिली. त्यांनीही घटनेची माहिती वरिष्ठांना दिली त्यामुळे वरिष्ठ साहय्यक अधीक्षक संतोष जोशी, सब पोस्ट मास्तर सुमंत काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिस या घटनेचा अधीक तपास करतीत आहेत.