सालेकसा : गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व दिशेला तालुक्यातून वाहत असलेली मोठी वाघ नदी, लहान वाघ नदी व कुआढास नदी, संपूर्ण जिल्ह्यात इतर तालुक्याच्या तुलनेत सर्वात जास्त लहान मोठी धरणे व तलाव आहेत. या जलसाठ्याचा उपयोग गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश भागाला व मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सिंचनासाठी होत आहे. तर, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी मात्र सिंचनाच्या पाण्याकरिता तहानलेल्याच आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी शोकांतिका असून, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींची कर्तव्यशून्यता यातून दिसते, असे म्हटल्यास तरी चुकीचे ठरणार नाही.
[read_also content=”बिडीओला ६५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे अटक https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/bdo-caught-red-handed-while-accepting-bribe-of-rs-65000-arrested-by-bribery-prevention-department-nraa-248341.html”]
तालुक्यातील पुजारीटोला व कालिसरार या मोठ्या धरणासोबतच बेवारटोला मध्यम प्रकल्प, ओवारा मध्यम प्रकल्प, मानगड लघु प्रकल्प व पिपरीया लघु प्रकल्प येथेच आहेत. तसेच, अनेक मामा व लपा तलाव याच तालुक्यात आहेत. यातील पाण्याचा उपयोग तालुक्यातील शेतीला व्हावा म्हणून कालव्यामार्फत शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पोहोचविण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, कालव्यात पाणी सोडताच शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याऐवजी नदी-नाल्यांना पाणी वाहून जातो. जिकडे-तिकडे कालवे फुटलेले असून कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या वाट्याचे पाणी नदी नाल्यात वाया जात आहे. याबाबत अनेक तक्रारी संबंधित विभागाला केल्या जातात. परंतु, सिंचनाची सोय करणारा विभाग म्हणजेच बाघ सिंचन व्यवस्थापन शाखा सालेकसा, गोंदिया सिंचन विभाग शाखा सालेकसा, जि. प. लघु सिंचन उपविभाग सालेकसा, लघु पाटबंधारे(स्थानिक स्तर) उपविभाग सालेकसा या विभागातील कार्यरत अभियंता यांना शेतकऱ्यांच्या सुखदु:खाशी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.