...तर निकाल अनपेक्षित असतील...; खासदार संजय सिहांचा खळबळजनक दावा
Vice President Elections 2025: भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळपासून निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. इंडिया आघाडी आणि भाजपकडून आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचे दावे केले जात आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. तर सायंकाळी पाच नंतर या मतदानाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. अशातच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
“आम आदमी पक्षाने कोणाला पाठिंबा द्यायची हे ठरवले आहे. आम आदमी पक्षाने विरोधी पक्षाचे उमदेवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व आप खासदार इंडिया अलायन्स उमेदवाराला मतदान करतील. पण इतर सर्व पक्षांनीही आपापल्या पक्षातील पक्षांतून क्रॉस वोटिंग होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आमच्या पक्षात अशी कोणतीही शक्यता नाही. तसेच आम्ही आमच्या कोणत्याही खासदारावर शंका घेत नाही. आम आदमी पक्षाची सर्व मते बी. सुदर्शन रेड्डी यांना जातील.”
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना आप खासदार संजय सिंह म्हणाले, “क्रॉस व्होटिंगचे एक उदाहरण कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत दिसून आले, जेव्हा भाजपच्या लोकांनी स्वतःच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या पसंतीच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केले. जर असे काही पुन्हा झाले, तर निकाल अनपेक्षित ठरू शकतात.”
उपराष्ट्रपती निवडणुकीतून बाहेर पडण्याच्या पंजाबच्या अकाली दल सारख्या काही पक्षांच्या निर्णयावर संजय सिंह म्हणाले, “निवडणुकीवर बहिष्कार टाकणे म्हणजे भाजपला पाठिंबा देणे. आता संपूर्ण पंजाब आणि संपूर्ण देशाला कळले आहे की जेव्हा संपूर्ण राज्य एका संकटातून जात आहे, तेव्हा अकाली दल भाजपच्या पाठीशी उभा आहे. ते किती मिश्र खेळ खेळतात हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. ते बाहेर त्यांच्याविरुद्ध बोलतात आणि आत त्यांना पाठिंबा देत राहतात.”