अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : साईबाबा संस्थानने साई समाधी मंदिरात राजवाड्यांच्या धर्तीवर ‘वूडन युनिक वॉक-वे’चीन मंदिरे अथवा राजवाड्यांच्या धर्तीवर ‘वूडन युनिक वॉक-वे’ निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामुळे साई मंदिराचे संपूर्ण स्वरूप पालटणार असून, प्राचीन आणि आलिशान वाड्याचे रूप त्यातून मंदिराला लाभेल, असा विश्वास साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी व्यक्त केला.
लोखंडी दर्शन रांगेऐवजी “वूडन युनिक वॉक-वे” लाकडी रेलिंग दर्शनरांग बनवण्यासाठी साधारणत: ८० लाख ते १ कोटी रुपये खर्च येणार आहे. देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातील दर्शनरांगेचे आधुनिकीकरण लवकरच केले जाणार असून, ‘युनिक वुडन वॉक वे’ मुळे साईमंदीर आणखीनच खुलून दिसणार आहे. तसेच सद्यस्थितीतील गुरुस्थान मंदीर पुजा-विधीसाठी अपुरे पडत असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्याचेही पुनर्निर्माण केल जाणार आहे.
‘सबका मालिक एक’चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आज देश-विदेशातून कोट्यवधी भाविक शिर्डीत येत असतात. साईबाबांच्या समाधी मंदिरात आल्यानंतर भाविकांना सध्या मंदिरात असलेल्या लोखंडी बॅरिगेट दर्शनरांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत. ही लोखंडी बॅरिटिंग मंदिरात चांगली दिसत नसल्याने साईबाबा संस्थानचा आता साई समाधी मंदिरात प्राचीन मंदिरे अथवा राजवाड्यांच्या धर्तीवर ‘वूडन युनिक वॉक-वे’ निर्माण करण्याचा मानस आहे. त्यासाठी येणारा खर्च भाविक करण्यास तयार आहेत.
भाविकांना मिळणार वेगळा अनुभव
रचनाकार नितीन देसाई यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी नक्षीकाम असलेले लाकडी रेलिंग त्याचे संकल्पचित्र बनवले आहे. दरम्यान, साई मंदिरात भाविकांनी प्रवेश केल्यानंतर राजवाड्यात अथवा प्राचीन मंदिरात प्रवेश केल्याचा वेगळ्या पद्धतीचा अनुभव भाविकांना येत्या काही दिवसात मिळणार आहे.
बालन यांच्याकडून मंदिराचा आराखडा तयार
शिर्डीतील साईबाबांच्या आगमनाची साक्ष आणि साईच्या गुरुस्थान असलेल्या गुरूस्थान मंदिराचेही पुनर्निर्माण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. ग्रामस्थांच्या भावनांचा आदर करत साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी नविन गुरुस्थान मंदिराचा आराखडा सुप्रसिद्ध मंदीर आर्किटेक्ट बालन टी. एन. यांच्याकडून तयार करुन घेतला आहे.
मंदिराच्या पुनर्निर्माणाची मागणी
साईमंदीराच्या मागे निंब वृक्षाच्या खाली असलेले गुरुस्थान मंदीर हे पंधरा वर्षापुर्वी बनवण्यात आलेले आहे. मात्र, ते लहान असल्याने त्यात पुजा करताना उंबऱ्याच्याबाहेर बसुन पुजा करावी लागते. शास्त्रात अशी पुजा निषीध्द मानली जाते. याच बरोबरीने मंदीर लहान असल्या कारणाने त्यात असलेल्या शिवलिंग तसेच बाबांच्या प्रतिमेवर उन, वारा, पाऊस पडतो. पर्यायाने मंदीराला मंडप टाकावा लागतो म्हणूनच या मंदीराचे पुनर्निर्माण करावे, अशी मागणी शिर्डीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.
मंदिर उभारणीचा खर्च भाविक करणार
समाधी मंदिराला शोभेसे, दगडी व प्राचीन ओळख दर्शवणारे हे मंदिर असावे अशी शिर्डीकराची इच्छा आहे. त्या मुळे ब्लॅक ग्रॅनाईटमध्ये हे मंदीर उभारले जाईल. मंदीराच्या उभारणीचा खर्च करण्यास अनेक भाविक पुढे आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.