पालक म्हणून कसा द्याल मुलींना आत्मविश्वास
या जगात सौंदर्यापेक्षा आकर्षक काही असेल तर ते म्हणजे आत्मविश्वास. एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देऊन त्याच्यात जो आत्मविश्वास जागृत केला जाऊ शकतो. एक काळ होता जेव्हा मुलींची प्रतिमा नाजूक होती. तिला राजकन्येप्रमाणे वागवत असल्याबाबत पालकांना अभिमान वाटत होता. स्वत:ला राजकन्या समजत, स्वावलंबी होण्याऐवजी, मुली राजकुमार शोधत राहिल्या आणि त्यांच्यातही आत्मविश्वास कमी झाला.
पण जीवनातील वास्तव याच्या अगदी उलट आहे. दिवसेंदिवस बदलणाऱ्या समाजरचनेमुळे अशक्य गोष्टीही शक्य करण्याची ताकद असणाऱ्या आत्मविश्वासी मुलीची गरज आहे. यासाठी कोणत्या टिप्सच्या मदतीने मुली आत्मविश्वास वाढवू शकतात याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ.युवराज पंत यांनी स्पष्ट केले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
मुलींसाठी आत्मविश्वास का गरजेचा?
मुलींना आत्मविश्वास देणे का गरजेचे आहे
याबाबत मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, काळाबरोबर समाजात बदल होत आहेत. मात्र नेहमीच पुरुषप्रधान समाज असल्याने मुलींमध्ये संकोच वाढू लागतो. याशिवाय मुलींच्या भविष्यातील योजनांबाबतही तडजोड करण्यात आली आहे. बदलत्या काळानुसार मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत यात शंका नाही. कुटुंब आणि समाजाच्या मानसिकतेत बदल झाल्यामुळे हे शक्य झाले आहे. मुलींच्या निर्णयांना पाठिंबा आणि बळ देऊन त्यांना समाजात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी तयार करता येईल. मात्र यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
स्वतःवर विश्वास ठेवा
मुलींना स्वतःवर विश्वास ठेवणे शिकवावे
पालक बरेचदा तुला हे जमणार नाही किंवा तुला ते जमणार नाही असं म्हणताना ऐकायला येतं. यामुळे मुलीच्या मनात नकारात्मकता वाढू लागते आणि इतरांच्या तुलनेत स्वतःला कमी लेखतात. सर्व प्रथम त्यांच्या भावना समजून घ्या. त्यानंतर मुलीला समजावून सांगा की तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता. तुम्ही प्रत्येक यश मिळवू शकता. त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढू लागतो.
कम्फर्ट झोनच्या बाहेर
एक काळ असा होता की मुलींना फक्त वडील आणि भावासोबत बाहेर जाण्याची परवानगी होती. मुलींसाठी सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे यात शंका नाही. पण त्याचबरोबर त्यांना जगाशी ताळमेळ कसा राखायला हवा ते शिकवा. त्यामुळे मुलींची आकलनशक्ती वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. त्यांना बाहेरगावी शिकायला अथवा नोकरीसाठी जाऊ द्या आणि प्रत्येक अडचणीला स्वतःहून तोंड देणे काय असते याची समज येऊ द्या.
सामाजिक आणि आर्थिक जबाबदारी शिकवा
कम्फर्ट झोनच्या बाहेर त्यांना काम करू द्यावे, जबाबदारी द्यावी
मुलांबरोबरच घरातील मुलींनाही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी जबाबदारीचे पालक म्हणून समान वाटप करा. यामुळे मुलींना केवळ विचार आणि समजून घेण्यातच मदत होत नाही तर त्यांना बाह्य वातावरणाशी जुळवून घेण्यासही मदत होते. मुली यामुळे सक्षम होतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढू लागतो.
योग्य निर्णयांना महत्त्व द्या
जर मुली कोणताही निर्णय घेताना त्यांचे मत देत असतील तर त्यांचे कौतुक करा आणि त्यांना समान मूल्य द्या. याशिवाय त्यांचा कोणताही निर्णय योग्य असेल तर त्याची अंमलबजावणी नक्की करा. यामुळे स्वतःवर विश्वास बसू लागतो आणि त्यांच्या संवादाची पद्धत बदलू लागते आणि त्या सक्षमपणे निर्णय घेऊ लागतात
हेदेखील वाचा – Parenting Tips: तुमची मुलं होतील अधिक युनिक, पालकांनी फॉलो करा या टिप्स
संकटाशी दोन हात करायला शिकवा
कोणत्याही संकटाला सामोरं जायला शिकवा
मुलींनी बाहेरच्या वातावरणाशी योग्य वेळी संपर्क साधला, तर सहज त्याच्याशी जुळवून घेतात. मुलींना कठीण परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे हेदेखील समजते. त्यांचे अतिसंरक्षण करण्याऐवजी, त्यांना एकट्याने आव्हानांचा सामना करण्यास शिकवणे आवश्यक आहे. अति सुरक्षा न दाखवता योग्य मार्ग दाखवा आणि त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तर त्या स्वतःवर विश्वास ठेऊ शकतील.