फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आपल्या दैनंदिन आयुष्यात राग ही एक सामान्य भावना आहे. ती टाळणे कठीण असते, पण तिच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. राग क्षणिक असला तरी त्याचा परिणाम दीर्घकालीन असू शकतो. रागाच्या क्षणी शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतात. अॅड्रेनालाईन आणि कोर्टिसोल यांसारखे स्ट्रेस हार्मोन्स वेगाने वाढतात. यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके जलद होतात आणि रक्त गोठण्याची शक्यता वाढते. हे सर्व घटक हृदयविकाराच्या झटक्याचे कारण ठरू शकतात.
२०२२ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार, वारंवार रागावणाऱ्या व्यक्तींना हृदयाचे आजार होण्याचा धोका अधिक असतो. एवढेच नव्हे तर ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास झाला आहे, त्यांच्यासाठी राग आणि नैराश्य ही स्थिती अधिक धोकादायक ठरते. कारण या भावनांमुळे शरीराची रिकव्हरीची गती कमी होते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे हे हृदयासाठी संरक्षणात्मक पाऊल ठरते.
रागाचा फटका केवळ हृदयालाच बसत नाही. सततचा राग हा इम्यून सिस्टिम कमकुवत करतो. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने शरीर आजारांना बळी पडते. सततच्या रागामुळे पचनतंत्र देखील बिघडते. वारंवार अॅसिडिटी, पोटदुखी, गॅस, इरिटेबल बाउल सिंड्रोम अशा समस्या दिसू शकतात. अभ्यासानुसार, रागामुळे कोलनच्या हालचालींवर आणि पचनाच्या कार्यक्षमतेवर थेट परिणाम होतो.
याशिवाय, स्नायूंमध्ये सतत ताण निर्माण होतो. डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी अशा समस्या वाढतात. न्यूरोस्पाईनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, ज्यांना वारंवार राग येतो त्यांना मान व पाठीच्या त्रासाचे प्रमाण जास्त असते. सर्वात धोकादायक बाब म्हणजे रागामुळे हृदयावर सतत ताण येतो. कॅटेकोलामाइन नावाचा हार्मोन रागाच्या वेळी जास्त प्रमाणात स्रवतो, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके दोन्ही वेगाने वाढतात. दीर्घकालीन पातळीवर हा ताण हृदयविकाराचे मोठे कारण बनतो. म्हणूनच, राग आला की खोल श्वास घेणे, ध्यानधारणा करणे, व्यायाम करणे, सकारात्मक विचारांची सवय लावणे हे उपाय उपयुक्त ठरतात. राग पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्यावर ताबा ठेवणे तुमच्या हृदयाच्या आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.