पिंपल्स आणि कोरड्या त्वचेवर 'या' पद्धतीने लावा बेसन, टॅनिंगच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका
प्रत्येकाला आपली त्वचा कायमच सुंदर आणि डागविरहित, चमकदार हवी असते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आणि मोठ्या मोठ्या फोड्या येतात. यामुळे त्वचेचे सौंदर्य नष्ट होऊन जाते. तर उन्हात जास्त वेळ बाहेर फिरल्यामुळे त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज होऊन जाते. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअरचा वापर करतात.वारंवार महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, ट्रीटमेंट आणि क्रीम लावल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. पण काही काळानंतर त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. कायमच महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला बेसनचा वापर करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. बेसन त्वचेवर लावताना त्वचेच्या समस्या समजून मगच लावावे. अन्यथा चेहरा खूप जास्त कोरडा पडू शकतो.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर काळेपणा, वांग किंवा काळे डाग आल्यानंतर बेसनाचा वापर करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही मिक्स करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. दह्यामध्ये असलेल्या नॅचरल लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि त्वचेचा रंग उजळदार होईल. तसेच दुपारच्या जेवणात वाटीभर दही खावे. दही खाल्ल्यामुळे त्वचा चमकदार आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.
तरुण वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बेसन आणि हळदीपासून बनवलेला फेसपॅक त्वचेवर लावावा. वाटीमध्ये बेसन आणि चिमूटभर हळद घालून मिक्स करा आणि त्यात गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि डोळ्यांभोवती लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आठवडाभर नियमित हळद आणि बेसनचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.
उन्हामुळे वाढलेला टॅनिंग आणि काळी झालेली त्वचा पुन्हा एकदा उजळदार करण्यासाठी बेसन आणि कच्च्या दुधाचा वापर करावा. यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेच्या मृत पेशी नष्ट करण्यास मदत करते. चमचाभर बेसन पिठात कच्चे दूध मिक्स करा आणि पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर होईल. आठवडाभरात चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी होण्यास मदत होईल.






