फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकजण काही ना काही तणावाला सामोरा जात आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांनाही अभ्यासाचा बोजा, स्पर्धा, मोबाईलचा अतिरेक यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता गणेश मंडळ यंदा आपल्या गणपती सजावटीत “व्हा Creative, व्हा Active” ही वेगळी संकल्पना घेऊन आले आहे. ही सजावट संकल्पना डॉ. सुमित पाटील यांची असून ती Left Brain Therapy वर आधारित आहे. डाव्या मेंदूचा भाग म्हणजे विचारशक्ती, युक्तिवाद, भाषा, अनुशासन, गणित, क्रमबद्धता या गोष्टींशी संबंधित आहे. या थेरपीद्वारे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. विस्कळीत विचार, चिंता किंवा निर्णयक्षमतेतील अडचणी यावर या पद्धतीचा उपयोग होतो.
सजावटीत मुलांना व प्रौढांना सहभागी करणाऱ्या अनेक अॅक्टिव्हिटीज ठेवण्यात आल्या आहेत. उदा. शब्दकोड्यातून गणपतीची नावे शोधणे, ठराविक रंगसंगतीनुसार रंग लावणे, वेगवेगळे आकार जोडून तयार झालेल्या चित्रांचा अर्थ लावणे. एका चौकोनी पॅनेलमध्ये ससा, माकड, पक्षी, झाड, घर अशा अनेक आकृत्या दिसतात. त्या पाहून गोष्ट किंवा कविता तयार करण्याचे आव्हान दिले जाते. या उपक्रमांमधून भाषिक व संज्ञानात्मक विकासाला चालना मिळते.
या सजावटीत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला असून दिव्यांगांसाठी रॅम्प व ब्रेल लिपीची सोय ठेवण्यात आली आहे. रंगीत, आकर्षक चित्रांमुळे लहान मुले मोबाईलपासून दूर राहून येथे वेळ घालवतील आणि त्यांच्या मेंदूचा विकास खेळता-खेळता होईल.
मंडळ फक्त सजावटीपुरतेच मर्यादित राहत नाही, तर सामाजिक उपक्रमांमध्येही पुढाकार घेते. दरवर्षी येथे येणाऱ्या गरजू भाविकांना व विमुक्त जातीतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. तसेच गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत केईएम आणि टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्ण व नातेवाईकांना मोफत नाश्ता दिला जातो. बुद्धी आणि शक्तीचा देवता असलेल्या गणरायाला साद घालत मंडळाचे घोषवाक्य यंदा खास आहे – “व्हा Creative, व्हा Active.” या अनोख्या सजावटीतून Left Brain Therapyचे महत्त्व अनुभवण्यासाठी गणेशभक्तांनी नक्कीच शिवाजी पार्कचा विघ्नहर्ता मंडळाला भेट द्यावी.