गणपतीला बाप्पा म्हणण्यामागे एक गोष्ट आहे. कधी त्याच्या दिसण्यावरुन तर कधी त्याच्या व्य़क्तिमत्वावरुन अशी गणरायाला असंख्य नावं आहेत. किस्सोंकी दुनिया या इन्स्टापेजवरुन ओमकार सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरंतर बाप्पाची असंख्य नावं आहेत. मात्र तरीही बाप्पा म्हणण्याचं विशिष्ट कारण आहे. गणांचा अधिपती म्हणजे गणपती. सर्व देवतांमध्ये आराध्य देव म्हणून गणपतीचा मान असतो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना गणेशपूजन केलं जातं. गणपतीला म्हणण्यात येणारं बाप्पा हे नाव तसं मराठी नाही. प्राकृत भाषेत बाप्पा हे नाव प्रसिद्ध झालं. बाप्पा या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप.
जसं वडील आपल्या मुलांचं पालनपोषण करतात. त्यांना सांभाळतात कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांच्या सोबत कायम राहतात. त्याचप्रमाणे गणपती देखील आपल्या भक्तांचं बापाप्रमाणे रक्षण करतो. त्यामुळे गणपतीला बाप म्हणजे जो आदर आणि प्रेम वडीलांना दिलं जातं तो आदर तिच माया आणि तोच विश्वास गणेशभक्त गणपतीवर ठेवतात. म्हणूनच श्रद्धा आणि आदरापोटी गणपतीला बाप्पा असं म्हटलं जातं. 18 व्या शताकानंतर या शब्दाची लोकप्रियता वाढत गेली आणि कालांतराने गणपतीला बाप्पाला म्हणणं प्रचलित झालं.






