शिळी चपाती खाण्याचे फायदे
चपाती शिवाय जेवण अपूर्ण आहे. जेवणात जर चपाती नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. भारतामधील वेगवेगळ्या भागात चपाती हा पदार्थ सगळीकडे बनवला जातो. सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यामध्ये किंवा बाहेर जाताना चपाती भाजीचा डब्बा नेला जातो. घरी रात्रीच्या वेळी जेवण बनवल्यानंतर चपाती किंवा भात शिल्लक राहतो. शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात किंवा इतर पदार्थ बनवले जातात. पण अनेक लोक रात्री शिल्लक राहिलेले जेवण फेकून देतात. अनेक लोकांचा असा समज आहे की शिळी चपाती खाल्ल्यानंतर पोटात गॅस किंवा असिडिटी होते. पण हा एक गैरसमज आहे. शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते प्रोटीन मिळते. तसेच चपातीमध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीराला ऊर्जा मिळते. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला शिळी चपाती खाल्ल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock )
मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त झाले आहेत. मधुमेह असलेल्या रुग्णांनी शिळ्या चपात्यांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर नाश्ता करताना शिळ्या चपात्या दुधात कुस्करून खाल्ल्यास आरोग्याला फायदे होतात. नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून आरोग्य सुधारते.
रक्तदाब वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवतात. अशावेळी तुम्ही शिळ्या चपात्या खाऊ शकता. हाय ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी सकाळी उठल्यानंतर कोमट दुधातून चपाती खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुधामध्ये अर्धा तास आधी चपाती भिजत घालून ठेवावी. त्यानंतर चपातीचे सेवन करावे.
गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी चपाती आरोग्यासाठी उपयुक्त आहे. चपातीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने असिडिटी किंवा इतर समस्या जाणवत नाहीत. पोटासंबंधित कोणत्याही समस्या जाणवू लागल्यास रोज रात्री कोमट दुधात एक चपाती भिजत घालून 15 मिनिटं ठेवा. त्यानंतर चपातीचे सेवन करावे. यामुळे ऍसिडिटी होत नाही.






