फोटो सौजन्य - Social Media
पितृपक्ष हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. यावर्षी पितृपक्षाची सुरुवात ७ सप्टेंबर २०२५ रोजी झाली असून त्याचा समारोप २१ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. हा काळ आपल्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पवित्र मानला जातो. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पितृकार्य केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद लाभतो, असे मानले जाते. पितृपक्षात श्रद्धा, संयम आणि सात्विकता यांना विशेष महत्त्व आहे. मात्र या काळात काही गोष्टी करणे अनुचित समजले जाते आणि त्यापासून दूर राहणेच योग्य ठरते.
पितृपक्षाच्या दिवसांत नवी खरेदी करणे टाळावे. दागिने, कपडे, घरगुती वस्तू किंवा आलिशान वस्तू घेणे अशुभ मानले जाते. साधेपणाने आणि संयमानं दिवस घालवणे अधिक योग्य ठरते. त्याचप्रमाणे या काळात विवाहसोहळे, पार्ट्या, वाढदिवस किंवा मोठे उत्सव साजरे करणे वर्ज्य मानले जाते. कारण हा कालावधी आनंदोत्सवासाठी नसून गंभीरता, स्मरण आणि आत्मचिंतनासाठी असतो. त्यामुळे घरात शांतता राखणे आवश्यक आहे.
याशिवाय धार्मिक परंपरेनुसार पितृपक्षात मांसाहार टाळावा. काहीजण या काळात लसूण-प्याजसुद्धा वापरत नाहीत. केवळ शाकाहारी व सात्विक आहार ग्रहण करणे श्रेयस्कर मानले जाते. तसेच या पवित्र काळात केस व नख कापणे, दाढी करणे यांसारख्या गोष्टी टाळाव्यात. कारण अशा कृतींमुळे पूर्वजांचा अपमान होतो असे मानले जाते.
या दिवसांत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादविवाद, भांडणं आणि नकारात्मकता टाळावी. घरात भांडणं, अशांतता किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा परिणाम पितरांवर होतो, असे मानले जाते. म्हणून या काळात शांतता, सकारात्मकता आणि परस्परांतील सामंजस्य राखणे गरजेचे आहे. एकंदरीत, पितृपक्ष हा पूर्वजांना आदरांजली वाहण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा काळ आहे. त्यामुळे या काळात साधेपणा, श्रद्धा आणि सात्विकता जोपासणे आवश्यक आहे. चुकीच्या सवयी किंवा कृतींमुळे पितरांचा अपमान होऊ नये, यासाठी वरील गोष्टींकडे नक्की लक्ष द्यावे.