(फोटो - istockphoto)
आईने दिले मुलाला किडनीदानातून जीवनदान
ससून रुग्णालयात ३५ वे किडनी प्रत्यारोपण यशस्वी
पुणे शहरात घडली हृदयस्पर्शी घटना
पुणे/चंद्रकांत कांबळे: आईने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःची किडनी दान करून त्याला नवजीवन दिल्याची हृदयस्पर्शी घटना पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात घडली. आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबातील २२ वर्षीय तरुणावर ससून रुग्णालयात Mother to Son Live किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून ही ससूनमधील ३५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली आहे.
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणाला जानेवारी २०२३ मध्ये उच्च रक्तदाबामुळे दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांनी तातडीने किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिल्यानंतर ७ जानेवारी २०२३ पासून त्याच्यावर डायलिसिस सुरू करण्यात आले. कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान केल्यास प्रत्यारोपण लवकर होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईने क्षणाचाही विलंब न करता किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
किडनीरोगतज्ज्ञ डॉ.संदीप मोरखंडीकर व डॉ.निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून ससून रुग्णालयात प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.यल्लपा जाधव, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ.लता भोईर व मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ.किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.
नाईट शिफ्ट करताय! मग आजच सोडा नोकरी, ‘या’ आरोग्याच्या समस्येला पडाल बळी
या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत मेडिसिन विभागप्रमुख डॉ.हरिदास प्रसाद, पथक प्रमुख डॉ.हर्षल भितकर व त्यांची टीम, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.निरंजन आंबेकर व डॉ.संदीप मोरखंडीकर, किडनी ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.सुरेश पाटणकर, डॉ.राजेश श्रोत्री, डॉ.हर्षद तोष्णीवाल, डॉ.विवेक बारेकर, व्हॅस्क्युलर सर्जन डॉ.शार्दूल दाते, भूलतज्ज्ञ डॉ.सुरेखा शिंदे, डॉ.सुजित क्षिरसागर तसेच परिचारिका व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.या संपूर्ण प्रक्रियेत समाजसेवा अधीक्षक तथा अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे व प्रांजल वाघ यांनी रुग्णास दाखल करण्यापासून ते प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपर्यंत समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
खाजगी रुग्णालयात १० ते १५ लाखांचा खर्च
खाजगी रुग्णालयांमध्ये किडनी प्रत्यारोपणासाठी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र रुग्णाचे वडील हे बीव्हीजी ग्रुप अंतर्गत साफसफाईचे काम करतात व त्यांना केवळ १३ हजार रुपये मासिक पगार मिळतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने एवढा खर्च करणे त्यांना अशक्य होते.
मुंबईत हृदय शस्त्रक्रियेत नवा मैलाचा दगड- मिनिमल इनवेसिव्ह पद्धतीने पाच ग्राफ्ट्स यशस्वी
ससूनमध्ये नाममात्र खर्चात प्रत्यारोपण
ससून रुग्णालयात सर्व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत अत्यंत नाममात्र खर्चात केल्या जातात. योजनेबाहेरील काही औषधे, इंजेक्शन, सर्जिकल साहित्य व आवश्यक तपासण्यांसाठी लागणारा खर्च सेवाभावी संस्थांच्या मदतीने उभारला जातो.आईच्या त्यागामुळे आणि ससून रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे या तरुणाला नवजीवन मिळाले असून ही घटना वैद्यकीय सेवेसोबतच मातृत्वाच्या महानतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.






