फोटो सौजन्य - Social Media
झोपेत अचानक अंगाला झटके येणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. अनेक जणांना या गोष्टी जाणवतात. मुळात, झोप घेत असताना शरीर पूर्णपणे विश्रांतीच्या स्थितीत जात असते, मात्र मेंदू काही वेळ सतर्क राहतो. झोपेच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही लोकांना असे वाटते की ते कुठेतरी पडत आहेत किंवा अडखळत आहेत, आणि त्याच वेळी शरीराला झटका बसतो. यालाच ‘हायपनिक जर्क’ असे म्हणतात. हे झटके क्वचित येणे सामान्य मानले जाते, मात्र वारंवार आणि तीव्र झटके जाणवत असल्यास ते काही आरोग्य समस्यांचे लक्षण असू शकते.
हायपनिक जर्क म्हणजे मायोक्लोनसचा एक प्रकार आहे, जो मेंदूमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या हालचालींशी संबंधित असतो. याचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी, तणाव, अति थकवा, अनियमित झोप आणि जास्त प्रमाणात कॅफिन घेणे यामुळे ते वाढू शकतात. झोपेच्या वेळी शरीराच्या स्नायूंमध्ये शिथिलता येते आणि हृदयाची गती मंदावते. मेंदूला कधी कधी असे वाटते की शरीर अधिक निष्क्रिय झाले आहे आणि त्यामुळे तो शरीराला झटका देतो. काही संशोधकांच्या मते, हे झटके मेंदूची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्या द्वारे तो शरीराचे नियंत्रण तपासतो. शरीर झोपेत पूर्ण शांत झाल्यावर, मेंदूला असे वाटते की ते कोसळत आहे आणि त्या परिस्थितीत तो शरीराला हलवून सावध करतो.
या झटक्यांची तीव्रता काही वेळा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील अवलंबून असते. दिवसभर जास्त मेहनत करणाऱ्या किंवा जास्त कसरत करणाऱ्या लोकांना हे झटके अधिक जाणवू शकतात. झोपेच्या आधी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीचा जास्त वापर करणेही यासाठी जबाबदार असू शकते. त्याशिवाय, तणाव आणि चिंता हे देखील मुख्य कारणांपैकी एक आहे. जेव्हा मेंदू तणावाखाली असतो, तेव्हा तो शांत झोप मिळवण्यात अडथळा निर्माण करू शकतो आणि त्यामुळे झोपेत झटके येऊ शकतात.
यावर उपाय म्हणून, रात्री झोपण्याच्या आधी हलकी योगसाधना किंवा ध्यान करणे उपयुक्त ठरू शकते. झोपेच्या आधी कैफीनयुक्त पदार्थ टाळणे आणि हलका आहार घेणे गरजेचे आहे. झोपेची वेळ निश्चित ठेवणे आणि पुरेशी विश्रांती घेणे देखील हायपनिक जर्क टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. सामान्यतः हे झटके हानिकारक नसतात, पण जर ते वारंवार होत असतील किंवा झोपेत अडथळा आणत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.






