पावसाळ्यात सर्दी खोकला का होतो (फोटो सौजन्य - iStock)
पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शाळेत एकमेकांच्या सहवासात आल्याने विशेषत: या काळात लहान मुलांना पटकन सर्दी-खोकला, ताप, जुलाब अशा समस्या उद्भवतात. मुंबई पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या आरोग्य समस्यांनी डोकं वर काढलं आहे. प्रामुख्याने २ ते १० वयोगटातील मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
या प्रकारचे आजार जरी सामान्य असले तरी ते अत्यंत चिंताजनक आहेत कारण ते सहजपणे पसरतात आणि कालांतराने उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. मुलांमधील संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली असून पालकांनी मुलांच्या योग्य ती खबरदारी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला दिला आहे.
संसर्गाचे प्रमाण वाढले
संसर्गाचे प्रमाण अचानक वाढले असून हवेतील आर्द्रता, सांडपाणी साचणे, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने आणि १० वर्षांखालील मुलांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. मुलं खूप संवेदनशील असतात आणि त्यांची प्रतिकारशक्तीही कमकुवत असते. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
नक्की कारणं काय?
दूषित पाणी, तापमानात झालेली घट आणि अस्वच्छतेमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतो. ओपीडीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये दररोज सर्दी आणि खोकल्याचे सुमारे १५ रुग्ण, अतिसाराचे ४ रुग्ण आणि विषाणूजन्य तापाचे ५ रुग्ण आढळत आहेत. जर वेळीच उपचार केले तर यामुळे डिहायड्रेशन, ब्राँकायटिस किंवा इतर संसर्गासारख्या गुंतागुंतीच्या समस्या उद्भवू शकतात ज्या श्वसन कार्यांवर परिणाम करू शकतात अशी प्रतिक्रिया पुण्यातील लुल्लानगर येथील मदरहुड हॉस्पिटल्समधील सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. अतुल पालवे यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यातील आजार
पावसाळा अनेकदा नेहमीच्या सर्दी आणि तापापेक्षाही अधिक आजार घेऊन येतो. गॅस्ट्रोएन्टेरिटिस आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जलजन्य आजार तसेच डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे डासांमुळे होणारे आजार हे साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे वाढतात. या काळात त्वचेचे संक्रमण, पुरळ उठणे, बुरशीजन्य संसर्ग आणि ब्राँकायटिस आणि न्यूमोनियासारख्या श्वसन समस्या देखील झपाट्याने वाढतात.
सर्दी-खोकल्याला म्हणा बाय-बाय! 5 घरगुती उपायांनी मुळापासून होईल सुटका
पालकांनी काय करावे
पालकांना प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक करणे आवश्यक आहे. उकळून थंड केलेले पाणी पिणे, उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन टाळणे, सॅनिटायझर्स आणि जंतुनाशकांचा वापर करुन स्वच्छतेची पुरेपुर काळजी घेणे आणि बदलत्या हवामानानुसार मुलांचे शरीर पुर्णपणे झाकले जाईल असे कपडे घालणे यामुळे संसर्गापासूम दूर राहण्यास मदत होते. डास प्रतिबंधकांचा वापर करणे, पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे आणि घराभोवती साचलेले पाणी रोखणे हे देखील महत्त्वाचे असे प्रतिबंधात्मक उपाय आहेत अशी माहिती डॉ. अतुल पालवे यांनी दिली.
अधूनमधून मुसळधार पाऊस पडत असताना, आरोग्य तज्ज्ञ कुटुंबांना आठवण करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत की त्यांच्या मुलांना पावसाळ्याशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी वेळोवेळी जागरूकता आणि आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.