खारघर कोस्टल रोडला होणार विलंब
नवी मुंबईः नवी मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा खारघर कोस्टल प्रस्तावित मार्गिकाच्या प्रकल्पाच्या निर्माणास वन विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर २०२६ मध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी असलेल्या या प्रकल्पामुळे खारघर, नेरुळ आणि बेलापूर भागातील वाहतुक सुलभ होणार आहे. हा प्रकल्प २०२९ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
सध्या बेलापुर किल्ला गावठाण भागात मार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी नियमित बाब झाली आहे. विमानतळ सुरू झाल्यावर वाहनांची संख्या वाढणार आहे. अशात वाहतूक कोंडीत अधिक भर पडणार आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खारघर कोस्टल रोड पर्यायी ठरण्याची शक्यता आहे. विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक होणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियोजनासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे
२०२६ मध्ये खारघर कोस्टलच्या निर्माणास सुरुवात
वाहतूक कोंडीवर पर्याय उपलब्ध होणार
खारघरमधील जलमार्ग सेक्टर १६ पासून खारघर रेल्वे स्थानकाजवळील पीएमएवाय गृहनिर्माण योजनेर्पत तसेच नेरुळमधील भुमिगत मार्गापर्यंत हा प्रकल्प विस्तारित केला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडीवर देखील पर्याय उपलब्ध होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे शीव पनवेल मार्गावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. २०२६ मध्ये सुरुवातीच्या काही महिन्यांत या प्रकल्पाच्या निर्माणास सुरुवात होणार असून २०२९ मध्य प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
विमानतळाला जोडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग
नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, विमानतळाच्या निर्मितीमुळे भविष्यात रस्ते मार्गावरही वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे या विमानतळाला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
सहा वाहिन्यांचा मार्ग
या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. हा मार्ग सहा वाहिन्यांचा असेल. त्यामुळे भविष्यातील या मार्गावरील प्रवास वेगवान असेल.९.६८ किमी लांबीचा असून त्यापैकी ६.६९ किमीची मार्गिका पूर्णपणे नव्याने बांधली जाणार आहे. तर २.९९ किमी मार्गिकाही पूर्वीच्याच मार्गिकेत दुरुस्ती करून ती या प्रकल्पाला जोडली जाणार आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या आर्थिक घडीला देखील चालना मिळणार आहे.






